औरंगाबाद : देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी यापुढे दरवर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जाईल, अशी घोषणा पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. (Marathwada Muktisangram Din)
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्या पर्यटन विभागातर्फे आज दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भारतमाता मंदिराच्या प्रांगणात एका विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. कार्यक्रमास केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांची मुख्य उपस्थिती तर प्रमुख अतिथी म्हणून ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांची उपस्थिती होती. विशेष अतिथी म्हणून देवजीभाई पटेल यांची उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण, मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींचा सन्मान, सामूहिक भारतमातेची आरती करण्यात आली. मराठवाडा मुक्तिसंग्रामावर आधारित पोवाड्यांचे सादरीकरण झाले, छायाचित्र प्रदर्शनातून मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा उलगडला. कौशल्य विकास प्रधान सचिव मनीषा वर्मा, आयुक्त दिपेंद्र सिंह कुशवाह, एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, औरंगाबाद प्रादेशिक पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक श्रीमंत हारकर आदी उपस्थित होते.