औरंगाबाद : मराठवाडा हा संयुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेशी बांधील आहे. काही हितसंबंधी लोक स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करीत आहेत. मराठवाडा जनता विकास परिषद ही संयुक्त महाराष्ट्राशी बांधील आहे, अशा आशयाचा ठराव परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीत घेण्यात आला आहे.
मराठवाडा जनता विकास परिषदेचे माजी अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख यांनी मराठवाडा विभागावर सतत अन्याय होत असल्यामुळे स्वतंत्र राज्याची मागणी केली होती. तेव्हा राज्यात त्याचे पडसाद उमटले होते. तेव्हाही या निर्णयाला मराठवाडा जनता विकास परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. काही महिन्यांपूर्वी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. व्यंकटेश काब्दे यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर झालेल्या पहिल्याच मध्यवर्ती कार्यकारिणीच्या बैठकीत स्वतंत्र मराठवाड्याचा मुद्दा निकाली काढला आहे. स्वतंत्र मराठवाड्याला परिषदेचा विरोध असल्याचा ठराव बहुमताने मंजूर केला आहे.
याशिवाय शासकीय नोकरभरतीमध्ये मराठवाड्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रतिनिधित्व द्यावे, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मागासलेल्या मराठवाड्याला झुकते माप देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मराठवाड्याला न्याय मिळावा, औरंगाबादेत मंत्रिमंडळाची बैठक व्हावी, राज्यपालांनी ३१ मे २०११ रोजी अध्यादेश काढून मराठवाडा, विदर्भ व उर्वरित महाराष्ट्राचा विभागवार अनुशेष काढण्यासाठी केळकर समितीची स्थापना केली होती. केळकर समितीच्या मार्गदर्शक तत्त्वाला डावलून राज्याचा विकास आराखडा तयार सादर केला.
या विकास आराखड्यात मराठवाड्यावर अन्याय केला असल्यामुळे तो राज्यपालांनी नामंजूर करीत अनुशेष काढण्यासाठी दुसऱ्या समितीची स्थापना करावी, नांदेड व लातूर येथे दोन आयुक्तालये तात्काळ स्थापन करावीत, मराठवाडा विकास मंडळाला पुरेसा निधी मिळावा, जलसंपदा नियमन प्राधिकरणाच्या कलमाप्रमाणे जायकवाडीला पुरेसे पाणी मिळावे, दुष्काळ निवारणासाठी तात्काळ पावले उचलावीत आणि मराठवाड्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध करून द्यावा, असे ९ ठराव मंजूर करण्यात आले.
परिषदेवर पदाधिकाऱ्यांची निवडपरिषदेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सरचिटणीसपदी प्राचार्य डॉ. शरद अदवंत, उपाध्यक्ष डॉ. के.के. पाटील, कोषाध्यक्ष इंजिनिअर द.मा. रेड्डी, सहचिटणीस प्राचार्य डॉ. डी.एच. थोरात, डॉ. अशोक सिद्धेवाड, अभ्यासगट प्रमुखपदी प्राचार्य जीवन देसाई यांची निवड केली आहे. अॅड. माधुरी क्षीरसागर यांची कार्यकारिणीसाठी नामांकन केले आहे.