छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष संपण्यास फक्त १६ दिवस उरले आहेत. या काळात सुमारे १६ ते २० कोटी रुपयांतून आठ जिल्ह्यांत सांस्कृतिक व विविध स्पर्धांचा धुरळा उडणार आहे. पूर्ण वर्ष गेले; परंतु, अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शासनपातळीवरील कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी पाऊल उचलले गेले नाही. सांस्कृतिक विभागाने कार्यक्रमांच्या आयोजनासाठी समितीची स्थापनादेखील केली, परंतु त्या समितीला देखील विश्वासात घेतले नसल्याने समिती कागदावरच राहिली आहे. महोत्सवाची रूपरेषा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनीच ठरविली आहे.
प्रत्येक जिल्ह्यासाठी नियोजन समितीतून दाेन कोटी रुपये देण्याचे ठरले असून चार कोटी रुपये यापूर्वीच मंजूर झाले आहेत. चार कोटींंमधून प्रत्येक जिल्ह्याला ५० लाख याप्रमाणे मंजूर करण्यात आले आहेत. डीपीसीतून दाेन कोटी आणि शासनाचे ५० लाख असे प्रत्येक जिल्ह्याला अडीच कोटी रुपये सांस्कृतिक उपक्रमांसाठी मिळणार आहेत. लेबर कॉलनीतील १०० कोटींतून मुक्तिसंग्राम लढ्याचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा मंजूर झाला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेला सुशोभीकरण व इतर प्रस्तावांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
समितीला डावलून कार्यक्रमांचे नियोजनसांस्कृतिक विभागाने २७ जून २०२३ रोजी अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी समिती स्थापन केली. त्यात १५ सदस्य आहेत. आ. अभिमन्यू पवार, डॉ. शिरीष खेडगीकर, निशिकांत भालेराव, सूर्यकांता पाटील, ॲड. आशिष वाजपेयी, राजकुमार धुरगुडे, डॉ. ऊर्मिला चाकूरकर, डॉ. रश्मी बोरीकर, गायक उदय वाईकर, ॲड. जी. आर. देशमुख, ॲड. वामनराव चटप, सुभाष जावळे, नितीन चिलवंत, दीपक ढाकणे, लक्ष्मण निकम यांचा समितीत समावेश असून यातील कुणालाही गुरुवारी निमंत्रित करण्यात आले नव्हते.
घाईघाईच्या नियोजनावर काय बोलले मुनगंटीवार?अमृतमहाेत्सवी वर्ष संपत असताना घाईघाईने कार्यक्रम घेतले जात आहे काय, यावर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, वर्षभर सर्वांना विश्वासात घेऊन अनेक कार्यक्रम घेतले आहेत. घाईघाईने कार्यक्रमाचे नियोजन नाही. निधीदेखील वेळेत दिला. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त सुशोभीकरणासाठीदेखील मनपाला निधी दिला.
विश्वासात घेणे गरजेचे होतेमुनगंटीवारांच्या उपस्थितीतील बैठकीची कल्पनाच नव्हती. मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवाची सांगता समारोह करीत असताना मराठवाड्यात जे स्वातंत्र्यसैनिक हयात आहेत किंवा त्यांची पिढी जे सध्या या विभागासाठी आस्थेने काम करीत आहेत. त्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे गरजेचे होते.-डॉ. रश्मी बोरीकर, सदस्य मराठवाडा अमृतमहोत्सवी वर्ष समिती