औरंगाबाद:मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ९ हजार २३५ कोटी रुपयांच्या अदांजपत्रकीय विकासकामांसह सिंचना योजनांच्या कालबध्द कार्यक्रमाची घोषणा केली. (Marathwada Muktisangram Din)
सिध्दार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभाला अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी मुख्य ध्वजारोहणानंतर केलेल्या भाषणात विभागातील जनतेला मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाचे स्मरण केले. यानंतर त्यांनी विभागाच्या विकासासाठी महत्त्वकांक्षी योजनांच्या घोषणा केल्या. दमणगंगेचे पाणी मराठवाड्याकडे वळविणे, मध्य गोदावरीत ४४ प्रकल्पांना मान्यता देणे, वैजापूरमधील शनिदेव उच्च पातळी बंधार्याच्या अंदाजपत्रका मान्यता देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. औरंगाबाद जिल्ह्यासाठी ५ हजार ३२३ कोटी, जालना जिल्ह्यासाठी २२९ कोटी, परभणी ५६० कोटी, हिंगोली ८९ कोटी, नांदेड ३७२ कोटी तर बीडसाठी १४२ कोटी, लातूरसाठी २ हजार ६०७ कोटी, उस्मानाबादसाठी अंदाजे १०० कोटींची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ.संजय शिरसाट, आ.हरिभाऊ बागडे, नारायण कुचे, अभिमन्यू पवार, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, सिडको मुख्य प्रशासक दीपा मुधोळ आदींची उपस्थिती होती.