छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जायकवाडी प्रकल्पात तात्काळ सोडावे, यामागणीसाठी मराठवाडा पाणी परिषदेच्यावतीने शुक्रवारी विभागीय आयुक्तालयासमोर दिवसभर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध सामाजिक संघटना, उद्योजक संघटनांनी उपोषणास्थळी भेट दिली. यावेळी आंदोलकांनी मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, देत कसे नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा देऊन आंदोलनस्थळ दणाणून सोडले.
यावर्षी मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली हे दोन जिल्हे वगळता उर्वरित मराठवाड्यात अत्यल्प पाऊस पडला.परिणामी मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात आज केवळ ४७ टक्के जलसाठा आहे. तन अन्य लघू आणि मध्यम प्रकल्पातही अत्यल्प पाणी उरलेले आहे. यामुळे यंदा मराठवाड्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे. यावेळी मराठवाडा पाणी परिषदेेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे म्हणाले की, दुष्काळग्रस्त मराठवाड्यात यंदा भीषण परिस्थिती आहे. आता शासनाने समन्यायी पाणी वाटपाची तातडीने अंमलबजावणी करून उर्ध्वभागातील धरणातून जायकवाडीत तात्काळ पाणी सोडावे. सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्याची मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तांमार्फत शासनास पाठविण्यात आली.
यावेळी जलतज्ञ शंकरराव नागरे, आ. हरिभाऊ बागडे, माजी आ. डॉ. कल्याण काळे, अनिल पटेल,आ. प्रशांत बंब, डॉ सर्जेराव ठोंबरे, जयसिंग हिरे डॉ भगवानराव कापसे, सर्जेराव वाघ, प्रवीण घुगे, पंडित शिंदे, प्रशांत देशपांडे, गोपीनाथ वाघ, महेंद्र वडगावकर , शिवाजी भुसे, प्राचार्य सलीम शेख, जयश्री किवळेकर, नितीन पाटील, रवींद्र बोडके, दिनेश पारीख मनोगत व्यक्त केले.
विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचा पाठिंबाया उपोषणाला मराठवाडा जनता विकास परिषद , मासिआ संघटना, मराठवाडा विकास युवक मंडळ, मराठवाडा मुक्ती मोर्चा, महाकेशर - आंबा बागायतदार संघ, विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटना शंभरहून अधिक ग्रामपंचायतींनी पाठिंबा दिला. उपोषणास संपूर्ण मराठवाड्यातून शेतकरी, महिला, उद्योजक, प्राध्यापक, शिक्षक, वकील, महाविद्यालय युवक, यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.