औरंगाबाद: मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेले मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ मिळण्याबाबत लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी पैठण येथील सभेत बोलतांना स्पष्ट केले.
विकास मंडळाला मुदतवाढ देण्यासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दुपारी विमानतळावर निवदेन दिले. यावेळी कृषीमंत्री अब्दूल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, सहकार मंत्री अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर यांची उपस्थिती होती.
मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाची मुदतवाढ झाल्यास येथील विकासकामांना गती मिळेल. त्यामुळे या मंडळासह राज्यातील उर्वरित मंडळाना मुदतवाढ देण्याची मागणी डॉ.कराड यांनी निवदेनातून केली. या मागणीचा मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने दखल घेत सभेत भाषण करतांना महामंडळाला मुदतवाढ देण्याबाबत राज्यपालांशी चर्चा करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले.