औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघात यावेळी बहुरंगी लढत होत आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी 15 पैकी केवळ 1 जणाने घेतला अर्ज मागे घेतला आहे. यामुळे आता १४ उमेदवारांमध्ये निवडणूक लढली जाईल. मात्र, राष्ट्रवादी आणि भाजपच्या बंडखोरांनी अर्ज मागे न घेतल्याने पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मराठवाडा शिक्षक मतदारसंघावर मागील काही वर्षांपासून वर्चस्व आहे. येथे विक्रम काळे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने किरण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. अगदी सुरुवातीपासूनच येथे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप लढत होईल असे चित्र होते. मात्र, अनेकांनी बंडखोरी करत अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढवली आहे. यातीलच एक नाव राष्ट्रवादीचे वक्तासेलचे प्रमुख प्रदीप सोळुंके यांचे आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळेंच्या ऐवजी पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. पण त्यांना यश आले नाही. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत विक्रम काळे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्या सोबत पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण देखील सोबत होते.
दुसरीकडे भाजपने किरण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजप, बाळासाहेबांची शिवसेनेचे उमेदवार पाटील यांचा अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शनात दाखल करण्यात आला होता. यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, आ. हरिभाऊ बागडे, नारायण कुचे, मेघना बोर्डीकर, सुरेश धस, निवडणूक प्रचारप्रमुख राणा जगजीतसिंह पाटील, सरचिटणीस संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्यासह मराठवाड्यातील नेते, पदाधिकाऱ्यांची, शिक्षकांची उपस्थिती हाेती.
बंडखोर रिंगणात दरम्यान, आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे प्रदीप सोळुंके यांनी अर्ज माघारी घेतला नाही. तसेच भाजपचे नितीन कुलकर्णी देखील रिंगणात आहेत. यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे.
पक्ष व अपक्ष मिळून यांच्यात रंगणार निवडणूकआ. विक्रम काळे - राष्ट्रवादी काँग्रेस, प्रा. किरण पाटील - भाजप, वंचित बहुजन आघाडीकडून कालिदास माने यांनी, तर प्रदीप साेळुंके, सूर्यकांत विश्वासराव, मनोज पाटील, संजय तायडे, कादरी शाहेद अब्दुल गफूर, अनिकेत वाघचौरे, नितीन कुलकर्णी, विशाल नांदरकर, प्रा. अश्विनकुमार क्षीरसागर, आशिष देशमुख, ज्ञानोबा डुकरे यांच्यात रंगणार लढत.