औरंगाबाद : मराठवाडा तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ, असा उल्लेख असलेली संस्था अनधिकृत आहे. याविषयीचा अहवाल शासनाला पाठविल्यानंतर शासनाने संबंधित संस्थेला अनधिकृत घोषित केले असल्यामुळे प्रवेश घेताना पालकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन औरंगाबाद येथील विभागीय तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव डॉ़ आनंद पवार यांनी केले आहे़
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या औरंगाबाद येथील विभागीय तंत्रशिक्षण मंडळांतर्गत मराठवाड्यातील ८ व नाशिक विभागांतर्गत येणाऱ्या ५ जिल्ह्यांमध्ये सुमारे ४०० महाविद्यालये संलग्न आहेत़ मंडळातर्फे १८६ पदविका अभ्यासक्रम (एआयसीटीई मान्यताप्राप्त ८० व शासन मान्य अल्पमुदतीचे १०६ अभ्यासक्रम) राबविले जातात. दहावीनंतर कौशल्य आधारित शिक्षण घेतल्यानंतर तात्काळ नोकरी लागते. यामुळे विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमांना ओढा असतो. या अभ्यासक्रमांच्या बनावट संस्थाही कार्यरत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या़
औरंगाबाद येथील ‘मराठवाडा तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ’ या संस्थेने पदविका अभ्यासक्रमातील तब्बल १९ अभ्यासक्रम सुरू केले़ परंतु हे अभ्यासक्रम अनधिकृत ठरविले. येथे प्रवेश घेऊ नका, असे आवाहन राज्य तंत्रशिक्षण मंडळाने केले आहे़ महाराष्ट्र अधिनियम, २०१३ नुसार कारवाई करून मराठवाडा तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ ही संस्था पदविका देण्यास पात्र नसल्याचे संचालकांनी स्पष्ट केल्याचे डॉ़पवार यांनी सांगितले़.