छत्रपती संभाजीनगर: अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील समुह धरणातून मराठवाड्यासाठी गोदापात्रात केवळ ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय. सोडलेल्या पाणीजायकवाडी धरणापर्यंत पोहचताना ३५ टक्के पाणी जिरणार आहे. मराठवाड्याच्या पदरात केवळ ५.६ टीएमसीच पाणी पडणार आहे.
मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे नांदेड, हिंगोली जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यातील लहान, मोठी धरणांनी तळ गाठला आहे. परिणामी आगामी काळात मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात आज केवळ ४५ टक्के जलसाठा उरला आहे. तर जायकवाडीच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील समुह धरणांत ९०टक्केपेक्षा अधिक जलसाठा आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती अधिनियम आणि समन्यायी पाणी वाटप तत्वानुसार १५ ऑक्टोबर रोजी जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्केपेक्षा कमी जलसाठा असेल तर उर्ध्वभागातील धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडणे बंधनकारक आहे.याविषयीचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी ३१ ऑक्टोबरपूर्वी घेणे बंधनकारक आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी सोमवार दि. ३० ऑक्टोबर रोजी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील समुह धरणांतून ८.६ टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य अभियंत्यांना दिले. सुत्रांनी सांगितले की, नगर आणि नाशिक जिल्हयातून मराठवाड्यासाठी गोदापात्रात ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असला तरी प्रत्यक्षात मात्र गोदापात्रातून जायकवाडी प्रकल्पात केवळ ५.६ टीएमसी एवढेच पाणी येणार आहेत. उर्वरित पाणी हे जमिनीत जिरणार आहे.
३० ते ३२ टक्के पाणी जमिनीत जिरेल समन्यायी पाणी वाटप तत्वानुसार गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी मेढेगिरी फॉम्युर्ल्यानुसार सोमवारी मराठवाड्यासाठी ८.६ टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील समुह धरणातून सोडण्याचा निर्णय घेतला. नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीपर्यंत पाणी येईपर्यंत सोडलेल्या एकूण पाण्यापैकी सुमारे ३० ते ३२ टक्के पाणी जमिनीत जिरेल आणि आपल्याला ५.६ टीएमसी पाणी मिळेल.- एस.के. सब्बीनवार,लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक तथा अधीक्षक अभियंता
प्राथमिक निर्णय आहे त्याचे स्वागतच करूमराठवाड्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय कार्यकारी संचालकांनी त्यांच्यासमोर उपलब्ध आकडेवारीनुसार घेतला आहे.नाशिक पासून जायकवाडी प्रकल्पापर्यंत पाणी येईपर्यंत किती टक्के पाण्याचा लॉसेस होतो, याचा आढावा घेऊन पुढे पाणी सोडण्याचा निर्णय कमी, जास्त होऊ शकतो.- डॉ. शंकर नागरे, जलतज्ज्ञ.
पाणी उपलब्ध करून देण्याची आवश्यकतामराठवाडा पाणी परिषदेच्या आंदोलनास प्रतिसाद देऊन जलसंपदा प्रशासन व शासनाने उर्ध्व भागातील धरणातून 8.6 टीएमसी पाणी मराठवाड्याची जीवन वाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात सोडण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो .परंतु संबंधित आदेशाची विरोधाला न जुमानता त्वरित अंमलबजावणी करून दुष्काळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची अत्यंत आवश्यकता आहे.- नरहरी शिवपुरे, अध्यक्ष मराठवाडा पाणी परिषद