- राम शिनगारे
औरंगाबाद : प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेल्या सेट-नेट परीक्षा जीआरएफमध्ये ५ वर्षांपूर्वीच उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळेना. संस्थाचालकांकडे जावे तर लाखो रूपयांची मागणी करतात. त्यामुळे एम.ए., एम.फिल. पूर्ण करून पीएच.डी.चे संशोधन शेवटच्या टप्प्यात असलेल्या युवकांने चक्क प्राध्यापक होण्याचा नाद सोडून देत व्यवसायाचा मार्ग पत्कारला आहे. व्यवसाय कौशल्यावर आधारित असल्यामुळे सर्व खर्च जाऊन प्रतिमहिना ५० ते ६० हजार रूपयांचा निव्वळ नफाही मिळत आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील बेलुरा गावातील सतीश आश्रुबा भोसले हा युवक २०११ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात पदव्युत्तरचे शिक्षण घेण्यासाठी आला होता. एम.ए. पूर्ण केल्यानंतर त्याने प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेल्या सेट-नेट परीक्षांची तयारी सुरु केली. दुसऱ्या प्रयत्नातच दोन्ही परीक्षा जीआरएफमध्ये उत्तीर्ण झाला. जीआरएफमध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे एम.फिल., पीएच.डी.च्या संशोधनासाठी शिष्यवृत्ती मंजूर झाली. दोन वर्ष एम.फिल.चे संशोधन केले. त्यानंतर पीएच.डी.चे संंशोधन अद्याप सुरू आहे.
मात्र पाच वर्षांच्या कालावधीत पात्र असूनही प्राध्यापक होण्यासाठी कोठेही संधी मिळाली नाही. दोन-तीन ठिकाणी मुलाखती दिल्या. मात्र लाखो रूपयांची देण्यासाठी पैसे नसल्यामुळे शांत बसावे लागले. वय वाढत होते. किती दिवस नोकरीचाच शोध घेणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. घरातील लोक लग्न करण्यासाठी मागे लागले. शिष्यवृत्ती मिळत असल्यामुळे संशोधनाचे काम सुरू होते. त्यामुळे २०१८ संपताच काही तरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मित्रमंडळींसह मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतुन काही पैसे वाचवून ५ लाख रूपये जमा केले. गावाकडील नातेवाईक वैजनाथ पवार यांना सोबत घेत माजलगाव येथे यशराज मल्टीसर्व्हिसेस दुकान टाकले. यात पॅन कार्ड काढून देणे, नॉनक्रिमिलेअर, रहिवाशी, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, रेल्वे, विमान, बसचे तिकिट बुकिंग, तिरुपती बालाजी दर्शन पास काढून देणे. याशिवाय शेतकऱ्यांना सातबारा काढून देणे, पिक विमा अर्ज भरून देणे, बँकेतुन पैसे काढणे-भरणे, एमटीएम अशी सेवा सुरु केली. ग्रामीण भागातील नागरिकांना या सेवा आवश्यक असल्यामुळे काही दिवसात अपेक्षित गर्दी होऊ लागली.
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी नातेवाईकांसह दोघांना १० रूपयांची गुंतवणूक करावी लागली. मात्र दोन महिन्याच्या आतच त्याचा परतावा सर्व खर्च जाऊन ५० ते ६० हजार रूपये महिना मिळू लागला आहे. सतीश चार दिवस पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करण्यासाठी औरंगाबादेत असतो. त्याचवेळी नातेवाईक दुकान सांभाळतो. तसेच गावातील दोन युवकांनाही त्याने रोजगार उपलब्ध करून देत दुकानावर कामाला ठेवले आहे. या व्यवसायात आणखी गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम नसल्यामुळे वाढ करता येत नाही. तरीही येत्या काही दिवसात मोठी भरारी घेता येईल, असेही सतीश सांगतो.
व्यवसायाची लाज वाटत नाही प्राध्यापक होण्यासाठी ४५ ते ५० लाख रूपये द्यावे लागतील. त्याशिवाय नोकरी मिळणार नाही. प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र आता परिस्थिती पाहून प्राध्यापक होऊ वाटेना गेले आहे. एवढे पैसे देऊन तर कधीच प्राध्यपक व्हायचे नाही. त्यामुळे व्यवसाय सुरु केला. एवढे शिक्षण घेऊनही दुकानावर बसताना काही लाज वाटत नाही. उलट स्वकृत्वातुन सुरू केलेल्या व्यवसायाचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया ही सतीश याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
पहा व्हिडिओ