औरंगाबाद : मराठवाडा विकास मंडळाचा कारभार सध्या ‘भाजप’ संघटन विकासाच्या दिशेने सुरू झाला की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. मंडळाच्या लेटरहेडवर पक्षबांधणी, बुथबांधणी, शक्तिकेंद्र प्रमुखांचा सन्मान, इतर राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतल्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्याने मंडळ मराठवाड्याच्या विकासासाठी आहे की भाजपच्या, यावरून संताप व्यक्त होत आहे.
मंडळ अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद तथा बुथ संपर्क अभियानाची माहिती मंडळाच्या लेटरहेडवर दिली आहे. त्यांनी अहवालात म्हटले आहे, मी सरकारतर्फे ग्रामीण निवासी दौरा करीत आहे. त्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेल्या भागामध्ये आपल्या सरकारमार्फत जाहीर केलेल्या सवलती तथा योजनांची माहिती देत आहे. चारा छावणीला की दावणीला ही कल्पना शेतकऱ्यांना पटते आहे. मनरेगासंबंधित माहिती देऊन फॉर्म नं.४ भरून घेत आहे. तसेच मुख्यमंत्री चषकासाठी तरुणांना माहिती देऊन फॉर्म भरून घेतले आहेत. सोबतच बुथ रचनेचा आढावा घेतला. ज्यामध्ये जे अद्याप गठित झालेले नव्हते, त्यांचे गठण केले. बुथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुखांना प्रमाणपत्र व छत्रपती शिवाजी महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा गौरव केला. तसेच विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून घेतला.
मंडळाचे लेटरहेड हे वैधानिक आहे. त्यामुळे त्याचा संघटना, राजकीय पक्षप्रवेश, बुथबांधणी आदी घटकांसाठी वापर करणे हे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटू लागल्या आहेत. मात्र, अध्यक्ष डॉ. कराड यांनी याप्रकरणी दावा केला की, मंडळाच्या कुठल्याही साधनांचा पक्षकार्यासाठी वापर केला जात नाही. मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे त्यांना दुष्काळी भागात केलेल्या कामांचे निवेदन दिले. त्या निवेदनावर दुष्काळात काय काम केले जात आहे, त्याची माहिती दिली. चारा छावणी, जनावरांची स्थिती, पाणीटंचाई, रोजगारासाठी मनरेगाची माहिती देण्यासाठी जिल्ह्याचा दौरा करीत आहे. यासाठी मंडळाचे वाहन, चालक वापरले जात नाही, मी खाजगी वाहनातून फिरतो आहे. बुथबांधणीची, पक्षप्रवेशाची माहिती त्यांना असावी, म्हणून निवेदनात उल्लेख केला. मंडळात पक्षबैठक घेऊन इतर साधने वापरलेली नाहीत. बुथ, शक्तिकेंद्र, पक्षप्रवेशाचा निवेदनात उल्लेख आहे, हे मात्र खरे.
अध्यक्षांनी पक्षकामासाठी लेटरहेड वापरू नयेमंडळ अध्यक्ष डॉ. कराड यांनी धडाडीने काम सुरू केले आहे; परंतु त्यांनी मंडळाच्या साधनांचा वापर राजकारणासाठी करू नये. राजकीय पक्षाचा प्रचार लेटरहेडवरून करणे, ही खेदजनक बाब आहे. ही निषेधार्ह बाब आहे, अध्यक्षांना याबाबत कुणीतरी समज द्यायला हवी. आठ ते दहा वर्षांनी या मंडळाला अध्यक्ष मिळाले आहेत. त्यांनी जर असे राजकीय दृष्टीने काम सुरू केले तर दुर्दैव आहे. मंडळाबाबत उलटसुलट मतप्रवाह आहेत. मंडळ काही करीत नाही, नुसते ठराव घेते असे बोलले जाते. पद आणि सत्तेचा वापर करून विभागाला निधी मिळविण्याचे काम अध्यक्षांनी करावे. त्यांनी संघटन बांधणीसाठी मंडळाचे दस्तवेज वापरू नयेत.-डॉ. व्यंकटेश काब्दे, तज्ज्ञ समिती सदस्य, मराठवाडा विकास मंडळ
लेटरहेड वापरणे चुकीचेमराठवाडा विकास मंडळ राजकीय कामाचे व्यासपीठ होऊ नये. ती वैधानिक रचना असून विभागाच्या अनुशेषासाठी त्या मंडळाला घटनात्मक दर्जा आहे. त्यामुळे मंडळाचे पावित्र्य जपणे हे कर्तव्य आहे. राज्यघटनेच्या तरतुदीनुसार स्थापन झालेले कायदेशीर अधिकार असलेले मंडळ आहे. संशोधन आणि अभ्यास करून ते विभागाच्या अनुशेषाबाबत संतुलित माहिती पुरविण्यासाठी व शिफारस करण्यासाठी निर्माण केले आहे. पक्षातीत दृष्टिकोनातून मंडळावर काम होणे अपेक्षित आहे. राजकीय कामकाजासाठी मंडळाचे लेटरहेड वापरणे चुकीचे आहे. पत्रव्यवहारात पक्ष संघटनाबाबत उल्लेख होऊ नये, याचे पथ्य यापुढे अध्यक्ष व इतरांनी पाळले पाहिले. -अॅड. प्रदीप देशमुख, अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद