छत्रपती संभाजीनगर : राज्यात झालेल्या लागोपाठ दुसऱ्या राजकीय भूकंपातदेखील मराठवाड्यातील आमदारांची भूमिका महत्त्वाची राहिली. मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. शरद पवार यांच्यासोबत राज्यसभेच्या सदस्या फौजिया खान, बीडचे संदीप क्षीरसागर आणि विधान परिषद सदस्य बाबाजानी दुराणी आहेत. तर प्रकाश सोळुंके, बाळासाहेब आजबे यांची भूमिका अद्याप तळ्यात-मळ्यात आहे.
वर्षभरापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडीत मराठवाड्यातील शिवसेनेचे दहा आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने सेनेला मोठे खिंडार पडले. मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ विधानसभा, तर तीन विधान परिषद सदस्य आणि फौजिया खान या राज्यसभेच्या सदस्य आहेत. यापैकी धनंजय मुंडे (परळी) आणि संजय बनसोडे (उदगीर) यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या वाट्याला आता सहा मंत्रिपदे आली आहेत. यात अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि तानाजी सावंत हे शिंदे गटाचे, तर अतुल सावे हे एकमेव भाजपचे मंत्री आहेत.
अजित पवारांसोबत गेलेले आमदारधनंजय मुंडे (परळी), संजय बनसोडे (उदगीर), राजेश टोपे (घनसांगवी), बाबासाहेब पाटील (अहमदपूर), राजू नवघरे (वसमत), सतीश चव्हाण (पदवीधर), विक्रम काळे (शिक्षक मतदारसंघ)
या इच्छुकांचे काय?या नव्या राजकीय घडामोडींमुळे मराठवाड्यातून मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले संजय शिरसाट, प्रशांत बंब, संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, आदींना संधी मिळणार की, राष्ट्रवादीच्या समावेशामुळे त्यांचा हिरमोड होणार, याबाबत उत्सुकता आहे.
पंकजा मुंडे काय निर्णय घेणार?राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे त्यांच्या भगिनी आणि राजकीय प्रतिस्पर्धी पंकजा मुंडे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. परवाच त्यांनी परळीतून आपली उमेदवारी जाहीर केली आहे. शिवाय, बीआरएससह अनेक पक्षांनी त्यांना ऑफर दिली आहे. परळीतून आता धनंजय मुंडे हे भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना युतीचे उमेदवार असतील. त्यामुळे कदाचित पंकजा मुंडे यांना लोकसभा लढविण्याचा आग्रह केला जाऊ शकतो.