- विजय सरवदेऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विषाणू प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आली असून येणाऱ्या दोन ते तीन महिन्यांत त्या ठिकाणी विविध प्रयोगशाळा तसेच विषाणू व औषधांच्या चाचणीसाठी पहिले प्राणिगृह अस्तित्वात येणार आहे. संशोधन आणि बौद्धिक संपदेच्या बळावर विद्यापीठाने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठवाड्याच्या शिरपेचात तुरा रोवला आहे. आता औषधांच्या चाचणीसाठी प्राणिगृह सुरू करून नवीन रेकॉर्ड निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे.
यासंदर्भात ‘डीएनए बारकोडिंग’ प्रयोगशाळेचे संचालक डॉ. गुलाब खेडकर यांनी सांगितले की, विद्यापीठात ‘डीएनए’ बार कोडिंग प्रयोगशाळा कार्यरत आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून सध्या कोरोना संसर्गाचे निदान करण्यात येते. दरम्यान, सन २०१९-२० मध्ये विषाणू चाचणीसाठी (व्हायरॉलाॅजी लॅब) प्रयोगशाळा उभारण्याचा प्रस्ताव कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकारी, भारत सरकार, राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान यांच्याकडून इमारत उभारणीसाठी दहा कोटींहून अधिक निधी मिळाला. त्यात विद्यापीठानेही स्वत:चा निधी खर्च करून ही भव्य इमारत उभारली आहे. या ठिकाणी अत्याधुनिक प्राणिगृह उभारले जाणार आहे. त्यात उंदीर, गिनीपिग (उंदराच्या जातीतील प्राणी), ससे, माकड, झेब्रा फिश इ. प्राण्यांचे संगोपन केेले जाणार असून त्यातील प्राण्यांवर विविध औषधी, लसींची चाचणी घेतली जाणार आहे. खासगी कंपन्यांनादेखील चाचणीसाठी प्राणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
प्राणिगृहाचा उपयोगनिरोगी तसेच रोगी अवस्थेत मानवाच्या शरीरात होणाऱ्या क्रियांचा अभ्यास करण्यासाठी प्रयोगशाळांतून विविध प्राण्यांचा वापर केला जातो. औषधी कंपन्यांमध्ये तयार होणाऱ्या औषधांची सुरक्षितता ही मनुष्यात वापरण्याआधी प्राण्यावर चाचणीद्वारे तपासली जाते. याशिवाय लस उत्पादन केंद्र तसेच वैद्यकीय संशोधन केंद्रांमध्ये प्राण्यांवर चाचण्या केल्या जातात.
नवीन इमारतीत अत्याधुनिक लॅबया इमारतीत व्हायराॅलॉजी लॅब, ह्यूमन जेनिटिक्स लॅब, ॲनिमल जेनिटिक्स लॅब, डिसिज जिनॉमिक्स लॅब, ॲग्रिकल्चर जिनॉमिक्स लॅब अशा अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू केल्या जाणार आहेत. याशिवाय ‘डीएनए बार कोडिंग लॅब’देखील स्थलांतरित करण्यात येणार आहे.
यासाठी परवानगी गरजेची‘डीएनए बार कोडिंग लॅब’साठी विद्यापीठाला इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या विभागाने ‘बीएस-३’ ही परवानगी आहे. आता ‘बीएस-४’च्या परवानगीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाची बायोसेफ्टी कमिटी प्रयोगशाळांची तपासणी करून ‘बीएस-४’च्या परवानगीसाठी शिफारस करेल.