औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर स्थितीत येत आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लावण्यासाठी नागरिकांनाच आठ दिवसांचा अवधी दिला आहे. त्यानंतर ही ऐतिहासिक औरंगाबाद शहरात नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये किंचितही फरक पडलेला नाही. सोमवारी दुपारी पैठण गेट, टिळकपथ, गुलमंडी, औरंगपुरा, रंगारगल्ली, सिटीचौक, सराफा, शहागंज, आदी भागात फेरफटका मारला असता ६० टक्के नागरिक, ८० टक्के व्यापारी मास्क विना आढळून आले.
२० फेब्रुवारी रोजी शहरात १२६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. रविवारी शहराचा हा आकडा थेट १८४ पर्यंत गेला. सुनामी लाटेसारखा कोरोना शहरात पसरत आहे. राज्यातील अनेक शहरे, जिल्हे लॉकडाऊनच्या झळा सोसत आहेत. रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लावावे किंवा नाही, याचा निर्णय नागरिकांवर सोपविला. सोमवारी औरंगाबाद शहरात याचा काही प्रमाणात तरी बदल दिसून येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, असे काहीच झाले नाही. सोमवारी सकाळपासून शहरातील बाजारपेठेत हळूहळू गर्दी वाढू लागली. सायंकाळी चार वाजल्यानंतर गर्दीत प्रचंड वाढ होत होती. पैठणगेट ते गुलमंडी, शहागंज ते सिटी चौक, गुलमंडी ते रंगारगल्ली या भागात पाय ठेवायलाही जागा नव्हती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ६० नागरिक मास्क न घालता फिरत होते. यात भरीस भर म्हणून ८० टक्के व्यापारी मास्क वापरत नसल्याचे दिसून आले. व्यापारी आणि नागरिकांच्या गळ्यात मास्क तर दिसून येत होता. मात्र, तो लावलेला नव्हता हे विशेष. मास्क न लावल्याने कोरोना होईल याची कोणतीही भीती नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या मनात दिसून आली नाही. या परिस्थितीवरून नागरिकांसह व्यापाऱ्यांना लॉकडाऊन हवा आहे असे दिसून येत आहे.
रुग्णसंख्या वाढली तर रात्रीचा लॉकडाऊन
शहरात येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली तर रात्रीचा लॉकडाऊन जाहीर करण्यात येईल, अशी शक्यता महापालिकेतील सूत्रांनी व्यक्त केली. १ मार्चनंतर परिस्थिती हाताबाहेर गेली तर दिवसाही लॉकडाऊन लावण्यात येईल.
दररोज ७० हजारांचा दंड वसूल
मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून महापालिका दररोज ६० ते ७० हजार रुपये दंड वसूल करीत आहे. यानंतरही नागरिक मास्क लावायला तयार नाहीत.