औरंगाबाद बाजारपेठेत कडाक्याच्या थंडीमुळे फळे व पालेभाज्यांचे भाव वधारले आहेत. यात दोडके, गवार शेंगाने १०० रुपये किलोपर्यंत उच्चांक गाठला आहे.
बाजार समितीमध्ये होलसेल विक्रीत दोडके २० रुपयांनी महागून ७० ते ८० रुपये किलो, तर गवार शेंगा ६० ते ८० रुपये विक्री झाल्या. किरकोळ विक्रीत दोन्ही भाज्या ८० ते १०० रुपये किलो विकल्या जात आहेत. २०१७ मध्येही या भाज्यांचे भाव १०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते. २० रुपये किलो विक्री होणारे टोमॅटो ५० ते ६० रुपये, ४० ते ६० रुपये विक्री होणारी भेंडी ६० ते ८० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे.
चांगल्या काकडीला भाव चढला असून, ४० ते ५० रुपये किलोने विकली जात आहे, मेथी, शेपू, कोथिंबीर ८ ते १० रुपये गड्डी, पालक, चुका ६ ते ८ रुपये, तर कांदापात ५ रुपयांना मिळत आहे. अशीच थंडी राहिली तर भाज्यांचे भाव आणखी वाढतील, अशी माहिती भाज्यांचे विक्रेते सागर पुंड यांनी दिली.