जालना जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी संपास संमिश्र प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी संपात सहभागी होणारे दुसऱ्या दिवशी दिसून आले नाहीत. त्यातच जालना बाजार समितीतील भाजीपाला मार्केट बंद असल्याने त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. मात्र, याचा गंभीर परिणाम शनिवारपासून सर्वत्र दिसून येईल, अशी चिन्हे आहेत.कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणे यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संप पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यात संपाला अनेक स्वयंसेवी संस्थांसह विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवत सहभागही नोंदवला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी संमिश्र परिणाम जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिसून आला. तर शुक्रवारी रांजणी, राणी उंचेगाव आणि माहोरा येथील आठवडी बाजारावर पडसाद उमटले. अंबड, भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यांत शेतकऱ्यांच्या संपास अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. तर जिल्ह्यात दूध संकलन इतर जिल्ह्यांच्या तुलनेने कमी असल्याने अपवाद वगळता याचा फारसा परिणाम दिसून आलेला नाही. घरोघरी दूध देणारे वा हॉटेल्सचालकांना दूध विक्री कमी झाली. शनिवारपासून दूधटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही आठवडी बाजार भरलेच नाहीत. तर काही सकाळी भरुन दुपारी बंद करण्यात आले. एरवी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या राजकीय नेत्यांनी गेल्या दोन दिवसांत संपाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. काँग्रेसने शुक्रवारी संपास पाठिंबा दर्शवला, तर इतरांनी जिल्ह्यात अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे संभ्रमाची स्थिती आहे. शनिवारपासून संपाची धार अधिक टोकदार होणार असल्याने विरोधकांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. जालन्यासह इतर तालुक्यांतील बाजार समित्यांतील भाजीपाला वगळता इतर व्यवहार सुरळीत होते. तर अंबड, घनसावंगी, बदनापूर यासह काही तालुक्यांत शेतकरी संपाला शेतकरीपुत्र म्हणवून घेणाऱ्यांचा पाठिंबा मिळाला नाही. घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथे भरत असलेल्या शुक्रवारच्या आठवडी बाजारावर शेतकरी संपाचा परिणाम दिसून आला. बाजारात भाजीपाला विक्रेता दुकानाची संख्या नेहमी पेक्षा कमी दिसून आली. राणीउंचेगाव येथील बाजारामध्ये बहुतांशी भाजीपाला विक्रेते जालना येथील मुख्य बाजारपेठेमधून भाजीपाला खरेदी करून राणीउंचेगाव येथील आठवडी बाजारात विक्रीसाठी आणतात. अखिल भारतीय मराठा महासंघानेही शेतकरी संपास पाठींबा दिला आहे.मंठ्यात विडोळी फाट्यावर शिवमुद्रा प्रतिष्ठानने शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवत सहभाग घेतला. या संपात शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदयसिंह प्रल्हाद बोराडे, एकनाथ काकडे, संतोष मोरे, वायाळ, दिगंबर बोराडे, भगवत गोंडगे,कृष्णा खरात, दीपक बोराडे, सुभाष बोराडे, शेळके , ऋषिकेश बोराडे, शाम काकडे, पवन खरात, योगेश बोराडे, दत्ता खरात, भगवान कुलकर्णी, राहुल खरात, जीवन रणशूर, अक्षय खरात, प्रताप खरात, किरण सोनार, पप्पू अवचार, विशाल शहाणे, आनंद जाधव, राम गोंडगे, अमोल अघाव, अदिनाथ गुंड, अजय बागल, तुकाराम तांगडे, पवन वाघमारे, यशवंत इंगळे, गोपाल बागल, प्रशांत मेहता, सतीश गणगे, सोमनाथ शेळके, रवि देशमुख आदी सहभागी झाले होते.
दुसऱ्या दिवशीही बाजार ठप्प..!
By admin | Published: June 03, 2017 12:39 AM