बाजार समिती निवडणूक: माजी प्रशासक जगन्नाथ काळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 06:36 PM2023-04-06T18:36:34+5:302023-04-06T18:36:50+5:30

राज्याचे पणन संचालक यांच्याकडे अपील दाखल करण्यास जगन्नाथ काळे यांना तीन दिवसाची मुदत देण्यात आली आहे .

Market Yard Election: Former administrator Jagannath Kale's candidature application was rejected | बाजार समिती निवडणूक: माजी प्रशासक जगन्नाथ काळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने खळबळ

बाजार समिती निवडणूक: माजी प्रशासक जगन्नाथ काळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने खळबळ

googlenewsNext

करमाड : छत्रपती संभाजी नगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्राची बुधवारी (सहा एप्रिल) छाननी करण्यात आली. त्यावेळी बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे व माजी मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे यांनी एक दुसऱ्याच्या विरोधात आक्षेप अर्ज दाखल केले होते. बुधवारी सुनावणी झालेला आक्षेप अर्जाचा निकाल गुरुवारी सकाळी जाहीर करण्यात आला असून जगन्नाथ काळे यांचे नामनिर्देशन पत्र नामंजूर करण्यात आले आहे. पॅनेल प्रमुख म्हणून समजण्यात येणाऱ्या काळे यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर झाल्याने महाविकास आघाडीमध्ये तसेच राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

राधाकिसन पठाडे यांनी आक्षेप घेतला होता की जगन्नाथ काळे हे व्यापारी असून पदाधिकारी आहेत. तसेच मार्केट यार्डत 42 शॉपमध्ये त्यांच्या फर्मच्या नावे 14 नंबर दुकान आहे. ग्रीन सेल्स अँड सर्विसेस या नावाच्या फर्म असल्याची माहिती आहे. म्हणून त्यांचे नामनिर्देशन पत्र रद्द करावे, अशी लेखी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली होती. आक्षेपाच्या अनुषंगाने बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे लेखी मागणी सादर केली. त्यात म्हटले की जगन्नाथ काळे हे व्यापारी आहेत, व्यापारी प्रतिनिधी आहेत तसेच बाजार समितीचे मुख्य बाजार आवारातील 42 शॉप कम गोदाममध्ये दुकान क्रमांक 167 ग्रीन सेल्स अँड सर्विसेस या नावाने नोंद आहे. तसेच बाजार समितीचे मुख्य बाजार आवारातील जनरल शॉपिंग सेंटर मधील दुकान नंबर 35 ,36, 37 ही व मेहर सीड्स जगन्नाथ काळे यांच्या नावावर आहे. काळे यांच्यावतीने अ‍ॅड. प्रसाद जरारे यांनी तोंडी युक्तिवाद करून सर्व आरोप फेटाळण्याची मागणी केली होती.

निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश बारहाते यांनी आक्षेप करते यांचा लेखी आक्षेप व युक्तिवाद तसेच काळे यांच्या अभियोक्त्यांनी सादर केलेले लेखी म्हणणे व युक्तिवाद तसेच बाजार समितीचे सचिव यांनी पुरविलेली लेखी माहितीच्या आधारे महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक नियम २०१७ मधील नियम 25( दोन )(क )नुसार नामनिर्देशन पत्र नामंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले. राज्याचे पणन संचालक यांच्याकडे अपील दाखल करण्यास जगन्नाथ काळे यांना तीन दिवसाची मुदत देण्यात आली आहे .या निर्णयामुळे काँग्रेस आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे. कारण जगन्नाथ काळे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांचे बंधू आहेत .त्यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे आगामी सभापती म्हणून पाहिले जात होते.

जगन्नाथ काळे यांनीही राधाकिसन पठाडे यांच्या नामनिर्देशन पत्रावर आक्षेप घेतला होता .त्यावर निर्णय देताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटले की सुनावणी वेळी दाखल केलेले लेखी आक्षेप व तोंडी युक्तिवाद यावरून राधाकिसन पठाडे यांचे विरुद्ध केलेल्या आरोपा आरोपाबाबत महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री प्रचालन व सुविधा अधिनियम 1963 चे कलम 53 नुसार बाजार समितीच्या निधीचा दुरुपयोग केल्याबद्दल सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले जबाबदारी निश्चितेचे आदेश सुनावणी दरम्यान दाखल केले नसल्यामुळे आक्षेपाचा मुद्दा सिद्ध होत नाही. त्यामुळे काळे यांनी केलेला आक्षेप अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे . त्याचप्रमाणे विविध कारणामुळे सहकारी संस्था सर्वसाधारण पाच ,सहकारी संस्था विभक्त जाती भटक्या जमाती दोन, ग्रामपंचायत सर्वसाधारण 7,ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक एक ,ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती तीन ,हमाल तोलारी मतदारसंघातून एक असे एकूण 19 नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले आहेत आता 181 वैध अर्ज असून 20 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील .

Web Title: Market Yard Election: Former administrator Jagannath Kale's candidature application was rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.