औरंगाबाद : गोव्यातील पर्यटनवृद्धी ( Tourism ) होण्याचे कारण म्हणजे तेथील यंत्रणेने १०० टक्के लसीकरण केल्याने गोवा कसा सुरक्षित आहे, याचे मार्केटिंग केले. परिणामी, जगभरातील पर्यटक पुन्हा तिकडे येऊ लागले. औरंगाबाद जिल्ह्याला देखील पर्यटनाला ( Aurangabad Tourism ) मोठा वारसा आहे. येथील लसीकरण १०० टक्के (Corona vaccination ) झाल्यास त्याचेही गोवा पॅटर्ननुसार मार्केटिंग करून पर्यटन वाढवावे, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये केल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल हेही उपस्थित होते. जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमध्ये विश्वास वाढावा. यासाठी पर्यटनाशी संबंधित क्षेत्रातील सर्व व्यक्तींचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे, असे पंतप्रधानांनी सुचविले. २५ डिसेंबर २०२१ पर्यंत १०० टक्के लसीकरणाची मुदत आहे.
पंतप्रधानांनी ज्या जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, अशा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह इतर राज्यांचे मुख्यमंत्री तसेच विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहभागी झाले. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी विविध उपक्रम राबवून लवकरच संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करण्यात येईल, असे पंतप्रधानांना सांगितले.
पंतप्रधानांच्या सूचनादुसरा डोस घेण्यासाठी जे लाेक येत नाहीत, त्यांना ट्रॅक करा. बूथवाईज ट्रॅकिंगसाठी यंत्रणांनी तयारी करावी. विशिष्ट समुदायाचे लोक लस घेण्यास पुढे येत नसल्यामुळे धर्मगुरूंची मदत घ्या. त्यांच्या आवाहनाचे व्हिडिओ सर्व माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहोचवा. दिवाळीच्या सुटीतदेखील लसीकरणाची मोहीम सुरू ठेवल्यास टक्केवारी घसरणार नाही. काही जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधानांनी कडक शब्दांत समज दिली.
शहरी, ग्रामीण भागात उपक्रम राबविणारलसीकरणाविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन कवच कुंडल अभियान राबवून लसीकरण वाढविले आहे. ‘मन में है विश्वास’ हा कोरोनाविरुद्धच्या लढाईत मनोबल वाढविणारा उपक्रम राबविला. या कार्यक्रमात विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते. सैन्यदलाचाही सहभाग होता. लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या पहिल्या २५ गावांना विशेष निधी देणार आहोत. शहरी तसेच ग्रामीण भागासाठी ‘मेरा वाॅर्ड सौ प्रतिशत टीकाकरण वाॅर्ड’, ‘संतांची भूमी शंभर टक्के लसीकरण भूमी’, असे वेगवेगळे प्रयोग करून टक्का वाढविणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.