व्यंकटेश वैष्णव , बीडगेल्या तीन वर्षापासून सणासुदीवरही दुष्काळाचे सावट होते. यंदा हंगामाच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले असून गणेश मंडळेही तयारीला लागली आहेत. मुर्तीकरांनी शेवटचा हात मारून आपले काम पूर्ण केले आहे. शहरातून सर्व तालुक्यांमध्ये तसेच लातूर, नाशिक जिल्ह्यातही मूर्तीची निर्यात केली जात आहे. पोळा, गणपती, गौरी आवाहान सण तोंंडावर आल्याने बाजारात रेलचेल पाहवयास मिळत आहे. गेल्या तीन महिन्यापासून मूर्तींना आकार दिला जात असून ग्राहकांच्या मागणीनुसार ५ इंचापासून १० फुटापर्यंतच्या गणेश मूर्ती बनविण्यात आल्या असल्याचे मूर्तीकार दिपक चित्रे यांनी सांगितले.वडिलोपर्जित व्यवसाय असून श्रावण महिन्यापासून एका-मागून एक सण येत असल्याने त्याची तयारी सहा महिन्यापासून केली जाते. व्यापार-व्यवसायिकांनी गणेश मूर्तीची खरेदी केली आहे तर गणेश मंडळांनी बुकींग केली असल्याचे चित्रे म्हणाले.दरवर्षी नवा ट्रेंड येत असून यंदा नव्याने दाखल झालेल्या पेशवा गणपतीचीे क्रेज निर्माण झाली आहे. याकरिता आवश्यक असलेले पी.ओ.पी. राजस्थान तर नारळाचा कात्या केरळातून आयात करावा लागतो. वाहतूकीचा खर्च वाढल्याने १० टक्यांनी दरात वाढ झाली आहे. शहरात अजून मूर्ती विक्रीचे स्टॉल लागले नसली तरी मूर्तींकारांकडे व्यापाऱ्यांची गर्दी होत आहे. वाढती मागणी पाहून मूर्तीकरांनी यंदा मूर्तीची संख्या वाढवली आहे. अद्यापपर्यंत तीन हजार लहान-मोठ्या मूर्ती बनविण्यात आल्या असल्याचे चित्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गणरायाच्या स्वागताला बाजारपेठाही सज्ज
By admin | Published: August 25, 2016 12:38 AM