औरंगाबाद : रणवीरसिंह, विराट कोहली, शाहिद कपूर, आनंद आहुजा यांनी त्यांच्या लग्नात घातलेल्या खास डिझायनर फेट्यांची क्रेझ यंदाच्या लग्नसराईत पाहण्यास मिळत आहे. या सेलिब्रिटींच्या नावानेच इतर नवरदेव व्यापाऱ्यांकडे फेटे मागत आहेत. या सेलिब्रिटी फेट्यांची लोकप्रियता लक्षात घेता व्यापारीही हुबेहूब तसेच फेटे बांधून देत आहेत.
फेटा बांधल्याशिवाय नवरदेवाचा पोशाख पूर्ण होतच नाही... फेटा बांधलेल्या नवरदेवाचा रुबाब काही औरच दिसतो. आता नवरदेव सोबत वऱ्हाडीही फेटे बांधत आहेत. आजही कोल्हापुरी फेटा पूर्वीइतकाच लोकप्रिय आहे. आता सेलिब्रिटींच्या लग्नामुळे आता फेटे डिझायनरही निर्माण झाले आहेत. परिणामी, फेट्यांमध्येही विविधता आली आहे. क्रिकेटर विराट कोहली याने लग्नात अबोली रंगाचा जोधपुरी पॅर्टनचा फेटा घातला होता. अभिनेता रितेश देशमुख याने घातलेला लाल रंगाचा व सोनेरी चेक्स असलेला बनारसी फेटा, आनंद आहुजा यांनी फिकट गुलाबी रंगाचा तर रणवीरसिंह यांनी हरियाणी पद्धतीचा फेटा परिधान केला होता. तसेच शाहिद कपूर याने पद्मावती चित्रपटात राजस्थानी पद्धतीचा घातलेल्या फेट्याची फॅशन यंदाच्या लग्नसराईत पाहण्यास मिळत आहे.
फेट्यांची क्रेझ लक्षात घेऊन शहरातील डिझायनर्सने सेलिब्रिटी फेटे बनविणे सुरू केले आहे. पूर्वी गडद रंगाच्या कपड्यांच्या फेट्यांना मागणी असे. आता फिकट गुलाबी, फिकट अबोली, फिकट सोनेरी रंगाला अधिक पसंत केले जात आहे. नवरदेवाच्या पोशाखाला मॅचिंग असे फेटे असतात. फेटा घातल्यावर फोटोमध्ये रिचनेस दिसून यावा, याकडे जास्त लक्ष असते. ७० टक्के नवरदेव हे सेलिब्रिटी फेटे खरेदी करीत आहेत किंवा भाड्याने घेत आहेत. एकदम ‘रांगडा’ लूकसाठी कोल्हापुरी स्टाईलच्या फेट्यांना पसंती दिली जाते. साधारणत: लग्नाच्या १० दिवस अगोदर फेटा पसंत केला जातो. पूर्वी तयार फेटे जास्त विकत. आता पसंत पडलेल्या कापडाचा फेटा बांधून घेतला जात आहे. त्यास टिच करण्यात येते. यामुळे तो व्यवस्थित बसतो, असे डिझायनरने सांगितले.
रितेशच्या मुंडावळ्या मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या लग्नात खास डिझाईनची मुंडावळी बांधली होती. ती मुंडावळी आता रितेश मुंडावळी नावाने लोकप्रिय झाली आहे. या लोकप्रियतेला हेरून डिझायनर्सने तशाच प्रकारच्या मुंडावळी तयार करून त्या बाजारात आणल्या आहेत.