औरंगाबाद : शिवशंकर कॉलनी येथे व्हॅलेंटाइन डेच्या मध्यरात्री मुलीचे नाव घेऊन अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करणाऱ्या तरुण हा एका विवाहितेवर एकतर्फी प्रेमात वेडा झाला होता. तो तिला सतत मोबाइलवर व्हिडिओ कॉल व मेसेज पाठवून त्रास द्यायचा. त्याच्या या त्रासाने कंटाळलेला विवाहितेने त्याच्याविरुद्ध घटनेच्या तीन दिवस आधी (११ फेब्रुवारी) क्रांतिचौक ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अदखलपात्र गुन्हा झाला होता, असे पोलीस तपासात समोर आले.
याविषयी पोलीस सूत्राने सांगितले की, सिल्लोड येथील रहिवासी आकाश दिलीप इंगळे (२२) याने १४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री शिवशंकर कॉलनीत अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेऊन आत्महत्या केली होती. दोन दिवसांनंतर त्याची ओळख पटली होती. त्याच्या वडिलांनी याविषयी त्यांची तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, शिवशंकर कॉलनीत कोणत्या मुलीच्या नावे आवाज देऊन त्याने आत्महत्या केली, ती मुलगी कोण याचा पोलिसांनी तपास केला असता ती मुलगी नसून विवाहिता असल्याचे समोर आले. तिची आणि आकाशची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. यातून दोघे इन्स्टाग्रामवर बोलत होते. आकाशने तिच्या बोलण्याचा अर्थ प्रेम असे समजून तो तिला बोलू लागला. त्याच्या मनात भलतेच काही असल्याचे तिच्या लक्षात येताच तिने त्याला समजावून सांगितले. ती विवाहित आहे आणि तिला दोन मुले असल्याचेही तिने सांगितले. यानंतर त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. वेळीअवेळी तो तिला कॉल, मेसेज आणि व्हिडिओ कॉल करू लागला. कॉल करू नको, असे तिने त्याला बजावले. मात्र तो ऐकत नसल्याचे लक्षात येताच तिने त्याच्याविरुद्ध क्रांतिचौक ठाण्यात दि. ११ फेब्रुवारी रोजी अदखलपात्र गुन्हा नोंदविला. ही बाब त्याला समजल्यावर आकाशने तिला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तिच्या घरी येणार असल्याचे सांगितले. त्याला घाबरून ती घरी थांबली नाही. दि. १४ रोजी रात्री आकाशने थेट तिच्या घरासमोर जाऊन तिच्या नावाने अनेकदा आवाज दिले आणि अंगावर पेट्रोल ओतून घेऊन जीवन संपविल्याचे पोलीस तपासात समोर आले.