वाळूज महानगर : वाळूजला एका २४ वर्षीय विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या तिघाजणांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पपीता राहुल वानखेडे (२४ रा. साई कॉलनी, वाळूज) हिने सोमवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी पपीता वानखेडे यांनी घरात चिठ्ठूी लिहिली होती. त्यात सासरच्या मंडळीकडून छळ होत असल्याने आत्महत्या करीत असल्याचा नमूद करण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी मृत पपीता वानखेडे यांचा भाऊ प्रीतम समाधान इंगळे (रा. कंझारा, ता. खामगाव, जि. बुलडाणा) याने पपीता हिला मुलगी झाल्याने तसेच नवीन घर बांधण्यासाठी माहेरून अडीच लाख रुपये आणण्यासाठी सासरची मंडळी छळ करीत असल्याने तिने आत्महत्या केली, अशी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पपीता वानखेडे यांचे पती राहुल वानखेडे, सासरे सहदेव वानखेडे व सासू रमा वानखेडे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विनायक शेळके हे करीत आहेत.
-----------------------------