औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात मोठ्या धामधुमीत झालेल्या लग्नातील विवाहितेने सासरकडून मिळालेले १५ तोळे सोन्याचे दागिने घेऊन लग्नापूर्वी प्रेम असलेल्या युवकासोबत सुंबाल्या केला. नंतर तिने प्रियकरासोबत दुसरा विवाह केल्याचे समजताच पहिल्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या दुसऱ्या नवऱ्याच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील बिडकीन येथील आशिष महावीर मोगल यांचा विवाह विष्णूनगर येथील युवती सोबत लॉकडाऊनच्या काळात धार्मिक पद्धतीने झाला होता. लग्नानंतर विवाहिता सासरी गेली. दिवाळीसाठी माहेरी आली होती. १९ नोव्हेंबर रोजी मोगल हे पत्नीला भेटले. त्याच्या दुसऱ्या दिवशी विवाहिता सासरी येणार होती. त्याच रात्री ती विष्णूनगरातून गायब झाली. तिने मोगल यांनी लग्नात घातलेले १५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने सोबत नेले. मोगल यांनी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार जवाहरनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांना तपासात मोगल यांची पत्नी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटीगाव येथे असल्याची माहिती मिळाली. ती तिचा प्रियकर सूरज गायकवाड सोबत राहत असल्याचे स्पष्ट झाले.
या दोघांना जवाहरनगर पोलिसांनी बोलावून घेतले. तेव्हा त्यांनी पोलीस ठाण्यात येत जबाब नोंदवला. यात माेगल यांच्या पत्नीने आपल्या मर्जीनुसार सूरज सोबत राहत असून, आम्ही विवाह केला असल्याचेही सांगितले. त्यामुळे पोलीसही काही करु शकले नाहीत. यानंतर पहिले पती मोगल यांनी जवाहरनगर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, त्यांनी पहिले लग्न झालेले असताना पत्नीने दुसरे लग्न केले. तसेच पहिल्या लग्नात घातलेले १५ तोळे सोने घेऊन पोबारा केला. यावरून पत्नीसह तिच्या दुसऱ्या नवऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार भाऊराव गायके करीत आहेत.