औरंगाबाद : महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या मालकीची ९२ हजार हेक्टर जमीन आहे. यातील एक इंचही जागा सर्वसामान्य नागरिकांच्या वापरासाठी देण्यात आलेली नाही. हजारो कोटी रुपये किमतीच्या जागा खाजगी मंडळींना लीजवर देण्यात आल्या आहेत. या जागांचा व्यावसायिक दृष्टीने वापर व्हावा म्हणून औरंगाबादेत पायलट प्रोजेक्ट म्हणून शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने मंगल कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हिमायतबाग चौकातील दोन एकर जागेवर दोन कोटी रुपये खर्च करून हे भव्य दिव्य मंगल कार्यालय उभारण्यात येईल.अल्पसंख्याक विभागातर्फे दरवर्षी औरंगाबाद महापालिकेस कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येतो. या निधीचा वापर ड्रेनेज लाईन टाकणे, नाल्या साफ करणे, नाल्यावर भिंत उभारणे आदी फुटकळ स्वरूपाची कामे करण्यात येतात. यंदा शासन निधीतून मंगल कार्यालय उभारण्यात येणार आहे. बुधवारी आ. इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी निधी पांडे, वक्फ बोर्डाच्या सीईओ नाहीदबानो, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी संयुक्तरीत्या हिमायतबाग परिसरातील वक्फच्या जागेची पाहणी केली. ३ एकर जागेपैकी एक एकरवर वक्फ बोर्डाचे विभागीय कार्यालय उभारण्यात येणार आहे. उर्वरित जागेवर मंगल कार्यालय आणि लॉन उभारण्यात येईल. हैदराबादच्या धर्तीवर हे मंगल कार्यालय राहणार असल्याचे आ. इम्तियाज जलील यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेस डॉ. गफ्फार कादरी, नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते अय्युब जहागीरदार, नगरसेवक फेरोज खान, शहराध्यक्ष अॅड. अन्वर कादरी आदींची उपस्थिती होती.
वक्फच्या जमिनीवर पहिल्यांदाच मंगल कार्यालय
By admin | Published: June 02, 2016 1:06 AM