लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील व्यावसायिक नितीन कटारिया व अंबडचे व्यापारी पुत्र गोविंद गगराणी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. शहरातील सकल मारवाडी समाजबांधवांसह व्यापा-यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विशेष म्हणजे हा गत आठ दिवसांत दुसरा मोर्चा होता.शिवाजी पुतळा परिसरातील गुरुगणेश भवन येथून सकाळी अकरा वाजता मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सर्वात पुढे नितीन कटारिया यांची मुले व कुटुंबातील सदस्य होते. शहरातील व्यापा-यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून मोर्चात सहभाग नोंदवला. शिवाजी पुतळा, कादराबाद, मस्तगडमार्गे मोर्चा गांधीचमन चौकात पोहोचला. तिथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या वेळी मोर्चात सहभागी पदाधिकारी व व्यापा-यांनी प्रातिनिधिक स्वरुपात आपल्या भावना व्यक्त केल्या. माजी आ. कैलास गोरंट्याल म्हणाले, की दोन व्यापा-यांचे खून होणे गंभीर आहे. व्यापाºयांनी सुरक्षेसाठी स्वत: रिव्हॉल्वर वापरावेत का, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कटारिया यांना संरक्षण दिले असते, तर ही घटना घडली नसती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया म्हणाले, की जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्थेचा धाक नसल्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी जालन्याचा बिहार झालाय का, असा सवाल उपस्थित केला. माजी आ. संतोष सांबरे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, पारसनंद यादव, दीपक भुरेवाल यांनीही भावना व्यक्त केल्या. नितीन कटारियांचे वडील ताराचंद कटारिया व मुलगी पलक यांना भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाल्यामुळे उपस्थितांचे मन हेलावले. माझ्या मुलाची हत्या करणाºयाला भर चौकात मारावे, अशी संतप्त भावना ताराचंद कटारिया यांनी व्यक्त केली. तर माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, तसे इतरांबाबत घडू नये यासाठी पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घ्यावे, अशी भावना पलक कटारिया हिने व्यक्त केली. मोर्चात उद्योजक किशोर अग्रवाल, संजय खोतकर, विनयकुमार कोठारी, हस्तिमल बंब, जगदीश भरतिया, गौतम मुनोत, रमेशचंद्र तवरावाला, राजेंद्र आबड, संजय मुथा, विजय कामड, सगीर अहमद, सुधाकर निकाळजे आदी उपस्थित होते. कटारिया व गगराणी यांना श्रद्धांजली अर्पण करून मोर्चाचा समारोप करण्यात आला. पँथर्स रिपब्लिकन पार्टीनेही या मोर्चास पाठिंबा दिला. दरम्यान, सेवली येथेही व्यापारी महासंघाच्या वतीने मूक मोर्चा काढून या घटनेचा निषेध करण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते एस.एस. सारडा यांनी प्रशासनाला निवेदन दिले.
कटारिया, गगराणींच्या मारेक-यांना फाशी द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:11 AM