औरंगाबाद : घराच्या बाहेर पडायचे झाले तरी सहज कमीतकमी तीन ते चार सौंदर्य प्रसाधनांचा वापर प्रत्येक महिला हमखास करतेच करते; पण कोरोनामुळे घरातच बसण्याची वेळ आली आणि त्यातही बाहेर पडायचे असल्यास मास्कची सक्ती झाली. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनांचा वापर झपाट्याने घसरला असून, मास्कने तर लिपस्टिकची लाली पार घालवूनच टाकली आहे.
कोरोनाचा जबरदस्त फटका सौंदर्य प्रसाधनांच्या व्यवसायाला आणि ब्युटी पार्लरला बसला आहे. मागील पूर्ण वर्षभरात सौंदर्य प्रसाधनांच्या उद्योगाची कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. दिवाळीच्या आसपास पुन्हा एकदा या व्यवसायात थोड्याफार प्रमाणात हालचाल सुरू झाली होती; मात्र आता मार्च महिन्यापासून पुन्हा एकदा व्यवसाय शून्यावर आला आहे. दालनाचे भाडे निघणे अवघड झाले आहे. दुकानातील कामगार पण कमी केले आहेत, पण जे आहेत त्यांचा पगार देणेही शक्य नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. मास्कच्या वापरामुळे आता लिपस्टीक, लीप लायनर, लीप ग्लॉस यांची विक्री आता अवघी २० ते २५ टक्क्यांवर आली आहे. उन्हाळा असल्याने सनस्क्रीन, डेली मॉईश्चरायझर यांचा वापर नेहमीप्रमाणेच आहे. काजळ, आय लायनर, मस्कारा, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट या सर्वांचीच विक्री अवघी ३०- ३५ टक्क्यांवर आली आहे.
चौकट :
१. ब्युटी पार्लरच्या मुळावर कोरोना
यंदा तरी लग्नसराई चांगली होईल, म्हणून ब्युटी पार्लर व्यावसायिकांनी मेकअपचे सामान, ब्राईडल ज्वेलरी यांची भरपूर खरेदी करून ठेवली होती. पण पुन्हा एकदा यावर्षीही कोरोना ब्युटी पार्लर व्यवसायाच्या मुळावर आला आहे. रोजचे ग्राहक तर घटलेच आहेत, पण ब्रायडल मेकअपच्या ऑर्डरपण एकतर रद्द झाल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या गेल्या आहेत.
- सुप्रिया सुराणा, ब्युटीशिअन.
२. व्यवसाय शून्यावर
घरी असणाऱ्या गृहिणींनी किंवा वर्क फ्रॉम होम करणाऱ्या महिलांनी तर पार्लरमध्ये येणे जवळपास सोडूनच दिले आहे. ज्या महिलांना ऑफिसला जावे लागते, त्या महिलाही पार्लरला येणे कटाक्षाने टाळत आहेत. आता तर जेव्हापासून शनिवार-रविवार लॉकडाऊन झाला आहे, तेव्हापासून व्यवसाय जवळपास शून्यावरच आला आहे.
- अंजली राजपूत, ब्युटिशिअन
प्रतिक्रीया
१. व्यवसायाला मोठी झळ
काही महिन्यांपूर्वी तरी व्यवसाय थोडाफार सुरू झाला होता; परंतु आता पुन्हा एकदा सर्वकाही ठप्प झाले आहे. एक तर सौंदर्य प्रसाधने अत्यावश्यक गोष्टींमध्ये येत नाहीत, तसेच दुसरे म्हणजे आता लग्नसराई, कार्यक्रम बंद झाल्याने सौंदर्य प्रसाधनांचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनांच्या व्यवसायाला खूप झळ बसली आहे.
- नीलेश पटेल, व्यावसायिक.
चौकट :
महिलांच्या प्रतिक्रीया
१. कॉस्मेटिक्सची खरेदी नाहीच
पुन्हा एकदा कोरोना आला आणि बाहेर जाणे किंवा घरी कोणी येणे बंद झाले. शिवाय घरातले काम करूनच आता वेळ पुरत नाही, त्यामुळे स्वत:कडे फुरसतीने बघणे बंदच झाले आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून कॉस्मेटीक्सची खरेदी केली नाही, असे काही महिलांनी सांगितले.
२. आता मेकअप कशाला
लग्नसराई किंवा इतर कार्यक्रम बंद झाले आहेत. शिवाय थोड्याफार कामासाठी बाहेर जायचे असले तरी मास्क लावावा लागतो किंवा सगळ्या चेहऱ्यावर स्कार्फ लपेटून घ्यावा लागतो. त्यामुळे आता मेकअप करण्याचे काम पडतच नाही. लिपस्टिक वापरणे तर कधीच बंद झाले आहे, असेही एरवी आवर्जून मेकअप करणाऱ्या महिलांनी सांगितले.