लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वीजचोरी करणाऱ्या रिमोट विक्रेत्यासह काही खरेदीदारांचा महावितरण आणि पोलिसांनी पर्दाफाश केला. चीनमधून आयात रिमोट आणि इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसच्या आधारे वीजचोरी कशी करावी हे शिकविणाऱ्या इलेक्ट्रिशियन तरुणाला पोलिसांनी अटक केली. वीज चोर ग्राहकांविरुद्ध गुन्हा नोंदविला, अशी माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव आणि महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस आयुक्त म्हणाले की, वीजचोरीसाठी लोक वेगवेगळे फंडे वापरतात. पोलिसांच्या मदतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संशयित वीज ग्राहकांच्या मीटरची तपासणी सुरू केली. या मोहिमेत काही ग्राहक विद्युत मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करताना आढळले. काही ग्राहकांनी चक्क चायना मेड रिमोट कंट्रोल अािण इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसचा वापर करून वीजचोरी सुरू केल्याचे समोर आले. मयूरपार्क येथील एका बंगल्यात महावितरणचे अधिकारी तपासणीसाठी गेले तेव्हा त्यांना तेथील मीटर बंद दिसले. त्यांना संशय आला. रीडिंग घेण्यासाठी मीटर सुरू असणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी घरातील महिलेस सांगितले. तेव्हा तिने रिमोट कं ट्रोल अधिकाऱ्यांच्या हवाली केला आणि रिमोटचे बटन दाबून मीटर सुरू करण्यात आले. त्या ग्राहकासह परिसरातील अनेक जण अशा रिमोटचा वापर करून वीजचोरी करीत असल्याचे आढळले. वीज ग्राहकांना विश्वासात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी किशोर रमेश राईकवार (रा. हर्सूल, मूळ रा. अमरावती) याने हे रिमोट कंट्रोल आणून दिल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी किशोरला ताब्यात घेतले.