बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करण्यात यावी, बंद पडलेले अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ तात्काळ सुरू करून एक हजार कोटींची तरतूद करण्यात यावी, विविध महामंडळांच्या वतीने पुन्हा कर्ज वाटप सुरू करण्यात यावे व मागची कर्जे माफ करण्यात यावीत या मागण्यांसाठीही हे आंदोलन असणार असल्याचे ते म्हणाले.
सकटे म्हणाले, मी आंबेडकरी चळवळीशी नेहमीच सोबत आलोय. तसे लेखन मी करीत आलोय. अलीकडच्या काळात अंधश्रद्धा वाढली आहे. मातंग समाजाचेच नव्हे तर साऱ्या भारतीय समाजाचे नुकसान झाले आहे. मातंग समाजाला अंधश्रद्धामुक्त करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत.
पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सांगितले की, बौद्ध समाजाने आरक्षणाचा खूप लाभ घेतला. त्यांची प्रगती होत आहे. त्या तुलनेत मातंग समाजाला आरक्षणाला लाभ मिळाला नाही, अशी भावना निर्माण होत आहे व ती खरी आहे. म्हणूनच आता आम्ही रस्त्यावरची लढाई लढायला सिद्ध होत आहोत. बाबासाहेब गोपले यांनी मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळावे ही मागणी केली होती. मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे या मताचे आम्ही आहोत, असेही सकटे यांनी सांगितले. दलित महासंघाचे सरचिटणीस सुरेश चव्हाण, सिद्धार्थ सदाफुले, राहुल पाटोळे, सुभाष आठवले आदींची उपस्थिती होती.