औरंगाबाद : लग्नाच्या १४ वर्षांनंतर बाळाच्या आगमनाची चाहूल लागली. प्रसूतीच्या वेदनेने रुग्णालय गाठले. पण, गुंतागुंतीच्या स्थितीने सिझेरियन प्रसूती करण्याची वेळ ओढावली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पहिल्याच सिझेरियन प्रसूतीप्रसंगी एकप्रकारे आव्हानच उभे राहिले. ही गुंतागुंत सिझेरियन प्रसूती यशस्वी झाली आणि १४ वर्षांनंतर मातृत्वाचा आनंद पसरला.
जामगाव- गंगापूर येथील ३५ वर्षीय महिला प्रसूती वेदनेने गुरुवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाल्या. डाॅक्टरांनी तपासणी केली तेव्हा, गर्भपिशवीचे तोंड उघडलेले, मात्र बाळाचे डोके वर होते. बाळाने शौच केली होती. तसेच हृदयाचे ठोकेही कमी झाले होते. या गुंतागुंतीच्या स्थितीने तात्काळ सिझेरियन प्रसूती करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. डाॅ. कविता जाधव, डाॅ. समृद्धी पाटील, डाॅ. नेहा चांडक, डाॅ. वैशाली जाधव यांनी ही सिझेरियन प्रसूती यशस्वी केली. लग्नाच्या १४ वर्षांनंतर या महिलेला मुलगी झाली असून, आई आणि बाळ या दोघांची प्रकृती चांगली असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. परिचारिका आशा सिरसाट, मीना पोटे, अनिता जारवाल, घोरपडे, निर्मळ यांनी मदत केली. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रदीप मुरंबीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कमलाकर मुदखेडकर यांनी मार्गदर्शन केले.
महिनाभरात २२ प्रसूती
जिल्हा रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात एकूण २२ नैसर्गिक प्रसूती झाल्या. आता येथे सिझेरियन प्रसूतीलाही सुरुवात झाली असून, हायरिस्क प्रसूती यशस्वी केल्याचे डाॅ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले.
-------
फोटो ओळ
जिल्हा सामान्य रुग्णालयात गुंतागुंत सिझेरियन प्रसूती यशस्वी करणारे डाॅक्टर, परिचारिका.