औरंगाबाद : मातीमोल भावातही खरेदी करायला कोणी तयार नसल्याने अखेर शेतकऱ्यांना ४ क्विंटलपेक्षा अधिक टवटवीत फुले कचऱ्याच्या गाडीत टाकावी लागली.
सिटीचौकातील फूल बाजारात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर बंद, मंगल कार्यालये बंद, धार्मिक, सामाजिक, व राजकीय कार्यक्रम बंद असल्याने त्याचा परिणाम फूल विक्रीवर झाला आहे.
फुलांचे भाव पाहिले की, शेतकऱ्याच्या हाती किती पैसे मिळत असतील याचा अंदाज येतो. बिजली, गलांडा २ ते ५ रुपये किलो, १० ते १५ रुपये शेकडा गुलाब, काकडा ६० रुपये, झेला १०० रुपये किलो, मोगरा ८० रुपये किलो, निशिगंध ४० ते ६० रुपये किलोने विकला जात आहे. मोगऱ्याचे भाव कधीच एवढे कमी झाले नव्हते. बिजली व गलांडा मातीमोल भावातही कोणी खरेदीसाठी पुढे येत नसल्याने बुधवारी सकाळी शेतकऱ्यांना ४ क्विंटलपेक्षा अधिक फुले कचरा गाडीत टाकावी लागली. यावेळी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. बबलू शेठ यांनी सांगितले की, बिजली व गलांडा शेतीतून काढणेसुद्धा परवडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फूल उत्पादक विलास तांबे यांनी सांगितले की, कोरोनामुळे मागील वर्षभरापासून फुलांची शेती तोट्यात चालली आहे, आता फुलांची शेतीच करायची नाही, असे आम्ही ठरविले आहे.
कॅप्शन
मागणी नसल्याने फुलांचे भाव गडगडले. मातीमोल भावात खरेदीला कोणी तयार नसल्याने अखेर फुलांना कचरा गाडीत टाकावे लागत आहे.