औरंगाबाद : राज्यात मुंबई आणि नागपूरनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण औरंगाबाद शहरात आहे. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट चक्क २१.७१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना नियम अधिक कठोर करण्यास आजपासून सुरुवात केली. शहराचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ वरून थेट ८७.५४ टक्क्यांवर आले आहे.
जिल्ह्यात १ हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात ८० टक्के रुग्ण आढळून येत आहेत. ४ ते ५ हजार नागरिकांची तपासणी केली तर त्यात किमान ८०० रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. पदमपुरा, एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदी महापालिकेच्या तपासणी केंद्रांवर रुग्णांच्या रांगा लागलेल्या आहेत. शहरात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दररोज पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांवर उपचार तरी कोठे करावेत, असा मोठा प्रश्न प्रशासनाला पडत आहे. येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये शहरात दररोज पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या १ हजाराच्या घरात राहणार आहे, असा अंदाज महापालिकेतील आरोग्य विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. दहा दिवसांपासून महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यापक प्रमाणात तपासण्या सुरू केल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत शहराचा पॉझिटिव्हिटी रेट जवळपास २२ तर रिकव्हरी रेट घसरत ८७ टक्क्यांवर आला.
१० वी, १२ वी च्या खाजगी शिकवण्या बंदरुग्णसंख्येचा उद्रेक पाहता प्रशासनाने आणखी कडक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. रविवारी रात्री उशिरा मनपा प्रशासनाने शहरातील दहावी आणि बारावीच्या सर्व खाजगी शिकवण्या बंद करण्याचा आदेश जारी केला. परीक्षा डोळ्यासमोर ठेवून अगोदर प्रशासनाने मुभा दिली होती. आता परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेल्याने हळूहळू कठोर निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे.