छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तालयातील निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांची बेगमपुरा, तर सचिन इंगोले यांची वाळुज वाहतूक पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वीच पदभार मिळालेला असताना पुन्हा बदली झाल्याने गांगुर्डे यांनी बदलीविरोधात मॅटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. परिणामी, पोलिस आयुक्तांनी पुन्हा गांगुर्डे यांना वाळुज वाहतूकच्या प्रभारीपदी कायम ठेवत इंगोले यांना छावणी वाहतूकच्या प्रभारीपदी नियुक्त केले.
आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी शहर पोलिस दलात खांदेपालट केली. गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांना एमआयडीसी वाळुजला, तर संदीप गुरमे यांची गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी नियुक्ती केली. याचदरम्यान उस्मानपुऱ्याच्या गीता बागवडे यांची वाळुज, तर वाळुजचे प्रभारी इंगोले यांची वाळुज वाहतूक पदी नियुक्ती केली. यामुळे तेथील प्रभारी गांगुर्डे यांना बेगमपुरा पोलिस ठाण्याचे प्रभारी करण्यात आले, तर काहींना आहे त्या पदावर कायम ठेवले. गांगुर्डे यांनी मात्र हा निर्णय स्वीकारण्यास नकार दिला. तत्कालीन आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या कार्यकाळात काही महिन्यांपूर्वीच गांगुर्डे यांची तेथे नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे ही बदलीच अवैध असल्याचा दावा करत त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली.
तर सर्वच बदल्या पुन्हा कराव्या लागल्या असत्या...सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गांगुर्डे यांच्या प्रकरणावर सुनावणीनंतर त्यांच्या बाजूने निकाल लागला असता तर सर्व बदली प्रक्रिया नव्याने करावी लागेल, असा ठोस अंदाज बांधण्यात येत होता. यामुळे खात्यांतर्गत मोठी खलबते झाली. त्यानंतर बुधवारी इंगळे व गांगुर्डे यांच्या बदलीचे नव्याने आदेश काढून गांगुर्डे यांना वाळूज वाहतूक प्रभारी पदी पूर्ववत ठेवण्यात आले. आधीच्या बदल्यांमुळे काही नाराज निरीक्षकांमध्ये मात्र या निर्णयानंतर खमंग चर्चा सुरू झाली होती. अनेकांचे आता निरीक्षक पदाच्या राज्यस्तरीय बदल्यांकडेदेखील लक्ष लागले आहे.