- शेख महेमूद
वाळूज महानगर ( औरंगाबाद ): ‘जन्नत’ मिळविण्यासाठी जगात अल्लाहची इबादत व त्यांचे लाडके नबी प्रेषित मोहंमद पैैगंबर यांनी दिलेली शिकवण आचरणात आणण्याचा सल्ला मौलाना शमीम साहब यांनी दिला. राज्यस्तरीय इज्तेमामध्ये रविवारी ‘जोहर’च्या नमाजनंतर त्यांनी लाखो साथींना मार्गदर्शन केले. पवित्र धर्मग्रंथ ‘कुरआन’ आणि ‘हदीस’चे विविध दाखले देत प्रत्येकाने भक्तीच्या मार्गाचा अवलंब करावा, असे त्यांनी नमूद केले.
राज्यस्तरीय इज्तेमामध्ये रविवारी सकाळी फजरच्या नमाजनंतर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर दुपारी शमीम साहब यांनी नमूद केले की, अल्लाह संपूर्ण मानवजातीचा दाता व शक्तिमान असून, अल्लाहचा संदेश प्रत्येकाकडे पोहोचविण्याचे काम प्रेषितांनी केले. संपूर्ण सृष्टीचा पालनहार एकमेव अल्लाह असून, अल्लाहच्या नजरेत मनुष्य अनमोल आहे. तमाम मानवजातीचे कल्याण व्हावे, यासाठी अल्लाहने जवळपास १ लाख २४ हजार प्रेषित (दूत) पृथ्वीतलावर पाठविले. प्रेषित पैगंबर हे अल्लाहचे शेवटचे दूत होते. यानंतर दूत पाठविण्याचा सिलसिला बंद झाल्यामुळे अल्लाहची इबादत, नबीचे विचार, कुरआनची तिलावत करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मौलाना शमीम यांनी सांगितले.
मौलाना शमीम पुढे म्हणाले की, ‘कलमा’ ज्याने मनात ठेवून चांगले आचरण केले तोच जीवनात यशस्वी होऊ शकतो. अल्लाहच्या सर्वच दुतांनी जीवन कसे जगावे, याविषयी मार्गदर्शन करून ‘इमान व दीन’चे महत्त्व पटवून दिले आहे. प्रत्येकाने अल्लाह हा एकच असून, तोच सर्वांचा ‘खालिक व मालिक’ असल्यामुळे प्रत्येकाने अल्लाहची शिकवण व प्रेषितांनी दाखविलेल्या मार्गावरून जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाने पाच वेळा नमाज न चुकता अदा करावी, ‘कुरआन’चे वाचन करावे.
प्रमुख उलेमांनी केली जनजागृतीइज्तेमात रविवारी पहाटे फजरची नमाज झाल्यानंतर मौलाना भाई मुश्ताक व दिल्ली निजामुद्दीन मरकजचे प्रमुख हजरत साद साहब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर दुसर्या सत्रात मौलाना शौकत साहब यांनी मार्गदर्शन करून जनजागृती केली.