छत्रपती संभाजीनगर : सोलापूर-धुळे महामार्गात जमिनीचे संपादन झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात मावेजा मिळाला. मात्र भूसंपादन होताना जमीन यलो झाली असल्यामुळे त्या दराने भाव मिळावा, यासाठी सहा वर्षांपासून शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारीत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी संचिका तपासणीसाठी विधी विभागाकडे पाठविलेली असताना तेथून संचिका गायब झाल्याचा आरोप करीत जमीन मालक ताराचंद भाटी यांनी गुरुवारी केला. विधी विभाग मुजोरीने वागत असून शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याचा आरोप करीत भाटी व इतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अकांडतांडव केले. भाटी यांची पंढरपूरमध्ये गट क्र. १७ मध्ये ५ एकर ९ गुंठे जमीन आहे. त्यातील ८४ गुंठे जमिनीचे २०१५ एनए केली. त्यातील महामार्गात ३६ गुंठे जमीन गेली. एनए जमिनीचा मोबदला वेगळा आहे. ग्रीन जमिनीसाठी मोबदल्याचे दर वेगळे आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ग्रीन वर्गची जमीन म्हणून मोबदला जागा मालकांनी घेतला. परंतु यलो जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी सहा वर्षांपासून पाठपुरावा सुरू असूनही त्यात काहीही न्याय मिळालेला नाही.
१० वर्षांपासून एकच विधी सल्लागारजिल्हाधिकारी कार्यालयातील विधी सल्लागार हे पद कंत्राटी आहे. परंतु १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून उषा वायाळ या त्या पदावर आहेत. प्रशासनातील इतर कंत्राटी कर्मचारी, अधिकाऱ्यांना ११ महिने झाले की, त्यांचा कार्यकाळ संपतो. मग एवढ्या वर्षांपासून एकच विधी सल्लागार प्रशासनाने का बदलला नाही. कंत्राटी भरतीची प्रक्रिया का राबविली नाही. ही सगळी मिलीभगत असल्याचा आरोप भाजपाचे सरचिटणीस संंजय केणेकर यांनी केला. यावेळी शेतकऱ्यांनी विधी विभागाकडून छळ होत असल्याचा आरोप केला.
संचिका कुठेही गेलेली नाहीसंचिका कुठेही गेलेली नाही. त्यांची संचिका जिल्हाधिकाऱ्यांकडून आली. ती लवाद शाखेकडे गेली. मी आज रजेवर होते. इतर शाखेतील कर्मचारी बाहेर गेलेले होते. त्यांना संचिका शोधून दिली आहे. संचिकेवर स्टम्पिंग झालेले नाही, तशीच संचिका ते घेऊन गेले.-उषा वायाळ, विधी सल्लागार