औरंगाबाद : शहरात १५२ कोटींतून सुरू असलेल्या रस्ते कामांना मेअखेरची डेडलाइन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरूवारी बैठकीत महापालिकेच्या यंत्रणांना दिली.
जिल्ह्यधिकारी कार्यालयात महापालिका विकासकामांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. यावेळी आयुक्त अस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस. डी. पानझडे, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणाले, कोरोना संसर्गाबाबत प्रतिबंधात्मक उपाय राबविण्याची कामे चालू असली तरी विकास कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये. सर्व विकासकामे मुदतीत व दर्जेदार होण्याच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी.
रस्ते कामांची माहिती देताना आयुक्त म्हणाले, एमआयडीसीच्या निधीतून ६० टक्के कामे, एम.एस.आर.डी.सी.तून ३० टक्के कामे, तर मनपा ४० टक्के रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मनपाच्या हिश्याचे काँक्रीटचे रस्ते करण्यासाठी शासन मूलभूत सोयी-सुविधांतर्गत अनुदान देणार आहे. शहर अभियंता पानझडे यांनी शहरात १६ हजार पथदिवे बसविण्यात आले असून, अजून तीन हजार पथदिवे बसविण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचा दावा केला.
जलकुंभाचे सर्वेक्षण करण्यात आले असून, शहरात सहा विविध ठिकाणी जलकुंभाचे काम सुरू केल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. घनकचरा व्यवस्थापन अधिकारी भोंबे यांनी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत खाम नदीची स्वच्छता, नदी किनारी वृक्षरोपण करण्यात आले असून, १ हजार झाडे लावल्याची माहिती दिली.