औरंगाबाद : शहरात संपूर्ण मे महिन्यात रणरणत्या उन्हाने नागरिकांची अक्षरश: परीक्षाच घेतली. आठ दिवस वगळता संपूर्ण महिन्यात तापमान चाळीस अंशांवरच राहिले. त्यातही मे महिन्याच्या अखेरीस तळपणाऱ्या सूर्याने शहरवासीयांना चांगलेच हैराण केले.
शहरात एप्रिल महिन्यात कमाल तापमानाने ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला होता. त्यानंतर तापमानाचा पारा काहीअंशी खाली राहिला. उच्चांकी तापमानाची नोंद होऊनही एप्रिलपेक्षा मे महिनाच अधिक तापदायक ठरला. मे महिन्याच्या प्रारंभीच ४० अंश तापमान नोंदविले गेले होते. त्यानंतर तापमान सतत चाळिशीवरच राहिले. गेल्या आठवडाभरापासून तर वाढलेल्या तापमानाने अंगाची लाही लाही होत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. सलग तीन दिवस तापमान ४२ अंशांवर राहिले. जून महिना तोंडावर असतानाही तापमान चढेच आहे. त्यामुळे कधी नव्हे एवढ्या अधिक तापमानाला सामोरे जावे लागत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.
तापमान सरासरीपेक्षा अधिकएमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक आणि हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर म्हणाले, प्रशांत महासागरावरचे तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिले. त्यामुळे अलनिनोची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मे महिन्यात आपल्याकडे अधिक तापमान राहिले.