महापालिकेच्या कारभारावरून अर्थमंत्र्यांसमोर महापौर, खासदारात जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:08 PM2020-01-31T12:08:04+5:302020-01-31T12:11:32+5:30
औरंगाबाद जिल्हा नियोजनावर चर्चा सुरू असताना राजकीय टोलेबाजीचा हा प्रकार घडला.
औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमचे खा.इम्तियाज जलील आणि महापौर नंदकुमार घोडेले यांच्यात अर्थमंत्री अजित पवार यांच्यासमोरच जुंपली. १५ जण मिळून महापालिकेचा कारभार चालवितात, असा आरोप खा.जलील यांनी केला. तर महापौर घोडेले यांनी त्या १५ जणांविरोधात मनपा निवडणुकीत उमेदवार द्या, असे आव्हान खा.जलील यांना दिले. या राजकीय सुंदोपसुंदीत अर्थमंत्री पवार यांनीही महापौरांना टोमणे मारले.
गुरुवारी विभागीय आयुक्तालयात वित्त व नियोजन आढावा बैठकीत औरंगाबाद जिल्हा नियोजनावर चर्चा सुरू असताना राजकीय टोलेबाजीचा हा प्रकार घडला. महापौर घोडेले यांनी अर्थमंत्र्यांकडे रस्त्यांसाठी निधी मागितला. त्यावेळी पवार म्हणाले, महापौर तुम्ही शहराचे प्रथम नागरिक आहात. मनपा वसुली करीत नाही. शासन किती मदत करणार मनपाला, तसेच वसुली, स्वच्छता, कचरा संकलन व इतर विकास कामांमध्ये मागे असल्यावरून त्यांनी मनपाचे कान टोचले.
महाविकास आघाडीत शिवसेना मोठा घटक पक्ष असताना अर्थमंत्री पवार यांनी विरोधी पक्षांप्रमाणे महापौर घोडेले यांना वागणूक देत असल्याचे पाहून खा.जलील यांनीही संधी साधली. ते म्हणाले, १५ लोक मिळूनच पालिका चालवितात. त्यावर महापौर म्हणाले, आम्ही काम करतो म्हणून सतत निवडून येतो. यावर तुम्हाला निवडून देणाऱ्या नागरिकांचेही आभार मानावे लागतील, असा टोला पवारांनी महापौरांना लगावला. महापौर म्हणाले, इंधनावर लावलेला अधिभार शासनाने आम्हाला द्यावा, शासनाला निधी द्यायची भावना नसेल तर हक्काची रक्कम तरी द्या, असे अर्थमंत्र्यांना बोलून महापौर सभागृहाबाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर महापौर खा.जलील यांना म्हणाले, जर तुम्हाला रोखायचे असेल तर त्या १५ लोकांच्या विरोधात तुम्ही उमेदवार द्या. आम्हाला थांबवून दाखवा, हे माझे आव्हान आहे तुम्हाला.