लातूर: राज्यातील २७ महानगर पालिकेतील महापौर पदाचे आरक्षण सोडत ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथे मंत्रालयात काढण्यात येणार आहे़ या सोडतीला उपस्थित राहण्यासाठी मनपा आयुक्तांसह महापौर, गटनेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे़ राज्यातील २७ महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत़ त्यात लातूर महापालिकेचाही समावेश आहे़ लातूर महापालिकेचे पहिल्या महापौर पदाचे आरक्षण खुल्या महिलेसाठी सुटले होते़ अडीच वर्षाचा काळ संपल्यानंतर नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण सुटले़ आता हा कालावधी संपत आला आहे़ शिवाय, या महापालिकेची विद्यमान सदस्यांची मुदत संपत येत असल्याने निवडणुका होऊ घातल्या आहेत़ त्यामुळे आरक्षण सोडत पुढील अडीच वर्षासाठी निघणार आहे़ मंत्रालयात सहाव्या मजल्यावर परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी ११ वाजता पुढील अडीच वर्षासाठी महापौर पदासाठी सोडत काढली जाणार आहे़ या सोडतीला लातूर मनपाचे आयुक्त रमेश पवार हे उपस्थित राहणार आहेत़ दरम्यान, आयुक्तांसह महापौर व गटनेत्यांना सोडतीसाठी निमंत्रण आले आहे़
महापौर पदाची आज आरक्षण सोडत
By admin | Published: February 03, 2017 12:38 AM