औरंगाबाद : पावसाळ्यापूर्वी दरवर्षी मनपा प्रशासनाला नालेसफाईचा विसर पडतो. यंदा तर आचारसंहितेचे निमित्त साधून प्रशासन डोळे मिटून बसले होते. आचारसंहितेचा आणि नालेसफाईचा मुद्याच नसल्याचे स्पष्ट झाल्यावर शहरातील सर्व ७२ नाले स्वच्छ करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिले. ६० कि. मी. नाल्यांची लांबी असून, दरवर्षीप्रमाणे थातूरमातूर सफाई करू नका, छोट्या जेसीबीचा वापर करावा, असेही आदेशित करण्यात आले.
महापौरांनी आज सकाळी नालेसफाईसंदर्भात सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. शहरात एकूण ७२ नाले आहेत. मोठ्या नाल्यांची संख्या १८ आहे. सर्व नाल्यांची लांबी ६० कि. मी. आहे. नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. पावसाच्या पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळत नाही. त्यामुळे मागील काही वर्षांपासून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरत आहे. नागरिक १२ महिने नाल्यांमध्ये कचरा आणून टाकतात. औषधी भवन, जयभवानीनगर, बारुदगरनाला, बायजीपुरा, संजयनगर, नागेश्वरवाडी, खोकडपुरा, औरंगपुरा, उल्कानगरी, कोकणवाडी आदी भागांत नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरण्याचा धोका आहे.
आज सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आढावा बैठक घेतली. अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे कारण पुढे केले. आपत्कालीन सेवेचा हा एक भाग असल्याचे सांगितल्यावर अधिकाऱ्यांनी नमते घेतले. नाल्यांच्या स्वच्छतेसाठी जेसीबी, पोकलेन, टिप्पर या वाहनांची तात्काळ अल्पमुदतीची निविदा काढण्याची सूचना केली. सोबतच मनुष्यबळ उभे करण्यासाठी प्रत्येक प्रभागाला ३ लाख रुपये देण्याचे सूचित केले. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नाल्यांची कामे पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पावसाळ्यात नागरिकांनीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापौरांनी केले. शहरात ११ ठिकाणी नाल्यांवर इमारती बांधल्या आहेत. मागील वर्षी औषधी भवनने नाल्याच्या स्वच्छतेचा खर्च पालिकेला दिला होता. शिवाई ट्रस्टने स्वत: नाल्याची स्वच्छता करून घेतली होती. उर्वरित इमारतधारकांकडून अगोदर स्वच्छतेची रक्कम वसूल करावी, असेही आदेश त्यांनी दिले.
प्रभागनिहाय नालेप्रभाग-१ १४ प्रभाग-२ ०५प्रभाग-३ १०प्रभाग-४ ११प्रभाग-५ १५प्रभाग-६ १२ प्रभाग-७ ११प्रभाग-८ १०