औरंगाबाद : राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा गोंधळ संपता संपेना. प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होऊन तीन महिने उलटले तरी अद्यापही प्रवेशाची एकही फेरी पूर्ण झालेली नाही. प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, २८ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे राज्यातील प्रवेशासाठी इच्छुक ३४ हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शासनाने ९ व १० मार्च रोजी प्रवेशपूर्व चाचणी परीक्षा (सीईटी)घेतली होती. या सीईटीचा निकाल ३१ मार्च रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर ८ जूनपासून ‘सार’प्रणालीमार्फत आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात केली. २० जून रोजी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर ‘सार’वर झालेली नोंदणी रद्द करण्यात आली. त्यानंतर ही प्रक्रिया जुन्या पद्धतीनेच सीईटी सेल आणि तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यास सुरुवात केली. पहिल्या राऊंडसाठी ३० जूनपासून आॅनलाईन नोंदणी करण्यास सुरुवात झाली. या विद्यार्थ्यांमधून १७ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यात नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेशनिश्चिती केली. याच कालावधीत जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडिज, मुंबई या संस्थेने जागावाटप करताना संस्थेचा स्वायत्त दर्जा ग्राह्य धरला नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात प्रवेश प्रक्रियेला आव्हान दिले. उच्च न्यायालयाने संस्थेचा दावा ग्राह्य धरून पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे पहिल्या फेरीत झालेले प्रवेशही रद्द करण्यात आले. पहिल्या फेरीतील प्रवेश रद्द झाल्यामुळे सीईटी सेलतर्फे पुन्हा नव्याने प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार ४ व ५ आॅगस्ट रोजी पहिल्या फेरीसाठी पुन्हा नव्याने नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर ७ आॅगस्ट रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार होती. तेव्हाच बोगस कागदपत्रे सादर केल्याचे सीईटी सेलच्या निदर्शनास आल्यामुळे पुन्हा प्रक्रिया ९ आॅगस्टपर्यंत लांबविण्यात आली. याचवेळी प्रवेश प्रक्रियेवर आक्षेप घेत रोहन विरानी, सुभाष गवस या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यानंतर १४ आॅगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान प्रतिवाद्यांना नोटिसा देत पुढील सुनावणी २८ आॅगस्ट रोजी होणार आहे. तोपर्यंत प्रवेश प्रकिया सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या गोंधळामुळे तब्बल तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सोशल मीडियात ट्रेंडएमबीए प्रवेश प्रकियेतील गोंधळामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी शासनाविरोधात प्रचंड रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. १५ आॅगस्ट रोजी टिष्ट्वटरवर ‘एमबीए डिले’ नावाने ट्रेंड सुरू करण्यात आला होता. हा ट्रेंड दिवसभर चौथ्या स्थानी होता. काही वेळात २३ हजार १०० टष्ट्वीट करीत राज्य शासन आणि सीईटी सेलचा निषेध नोंदविण्यात येत होता. याशिवाय काही विद्यार्थ्यांनी फलक हाती धरून आमचा दोष काय? अशा पद्धतीची मोहीमही सोशल मीडियात राबविली आहे.