छत्रपती संभाजीनगर : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात येणाऱ्या मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शनिवार व रविवारी सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, शनिवारी पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणीमुळे सुरूवातीला रजिस्ट्रेशनच होत नव्हते. त्यामुळे दोन्ही सत्रांत विद्यार्थ्यांना बराचवेळ ताटकळत बसावे लागले. परिणामी, परीक्षेला प्रचंड विलंब झाला.
यासंदर्भात तंत्रशिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, ‘सीईटी’ सेलच्यावतीने सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २५ आणि २६ मार्च रोजी सामाईक प्रवेश परीक्षा (महा-एमबीए सीईटी २०२३) घेतली जात आहे. शनिवारी २५ मार्चपासून या परीक्षेला सुरुवात झाली. शहरातील ६ केंद्रांत ८ हजार ९६८ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ५ या दरम्यान ही ऑनलाइन परीक्षा होती.
ऑनलाइन परीक्षेसाठी सुरक्षेच्या दृष्टीने सुरूवातीला विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक होते. रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच संबंधित विद्यार्थ्यास संगणकावर पेपर सोडविता येणार होता. मात्र, दोन्ही सत्रांत तांत्रिक अडचणींमुळे रजिस्ट्रेशनची प्रक्रियाच होत नव्हती. या प्रक्रियेत सकाळच्या सत्रात दीड तास, तर दुपारच्या सत्रात काही केंद्रांवर तब्बल दोन तास विलंबाने परीक्षेला सुरूवात झाली. त्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापकांचा गोंधळ उडाला. पालकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरल्याचे दिसून आले. परीक्षा समन्वयक व काही प्राध्यापकांनी तांत्रिक बिघाड दुरूस्तीसाठी ही परीक्षा घेणाऱ्या कंपनीशी संपर्क साधत होते.