औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील (घाटी) मेडिसिन विभागाच्या एमआयसीयूत शनिवारी (दि.२०) सायंकाळी अचानक शॉर्टसर्किट झाले. यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन डॉक्टर, नातेवाईकांची एकच धावपळ उडाली. येथील रुग्णांना त्वरित इतर वॉर्डात हलविल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
घाटी रुग्णालयातील मेडिसिन विभागात दुसऱ्या मजल्यावर एमआयसीयू आहे. याठिकाणी सहा रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ‘एसी’मध्ये शार्टसर्किट झाले आणि त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे व्हेंटिलेटर बंद पडले. हा प्रकार लक्षात येताच विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांच्यासह अन्य डॉक्टरांनी एमआयसीयूत धाव घेतली. येथील रुग्णांना वेळीच दुसºया वॉर्डात हलविण्यात आले. विभागातील डॉक्टरांनी झटपट प्रयत्न केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर विद्युत बिघाड दुरुस्त करण्यात आला.
या घटनेनंतर खबरदारी म्हणून एमआयसीयूचे निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेण्यात आले. निर्जंतुकीकरण पूर्ण झाल्यानंतर रुग्णांना पुन्हा या वॉर्डात हलविले जाईल.वेळीच दुरुस्तीकेवळ एसीमध्येच शार्टसर्किट झाले. त्याची वेळीच दुरुस्तीही करण्यात आली. प्रत्येक तीन महिन्यांनंतर वॉर्डाचे निर्जंतुकीकरण करावे लागते. त्यामुळे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सर्व रुग्ण अन्य वॉर्डात हलविण्यात आले, असे डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले.