छत्रपती संभाजीनगर : कुख्यात अमली पदार्थ तस्कर अजय रमेश वाहूळ उर्फ ठाकूर याच्यासह टोळीतील सदस्यांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली.
एनडीपीएस पथकाच्या प्रमुख पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने ३ फेब्रुवारी रोजी रेकॉर्डवरील आरोपी अजय वाहूळ ऊर्फ ठाकूर याच्या सातारा परिसरातील घरी छापा टाकला होता. या छाप्यात अजय ठाकूर व त्याची पत्नी राणी अजय ठाकूर हे अमली पदार्थ बाळगून विक्री करत असताना आढळून आले. त्याच्या घराची झडती घेतली असता १ लाख ५ हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ आढळून आले होते. त्याच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
अजय ठाकूर याला गुन्ह्यापासून रोखण्यासाठी २०१५ मध्ये त्याच्या विरोधात मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर २०२३ मध्ये एमपीडीए ॲक्टअतंर्गत वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध केले होते. तरीही त्याच्या कारवाया थांबल्या नाहीत. त्याची संघटित गुन्हेगारी सुरूच होती. त्यामुळे त्याच्यासह टोळीतील सदस्यांच्या विरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, तसेच या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त रणजीत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.