औरंगाबाद : शहरात बहुतांश आबालवृद्ध टीव्हीसमोर बसून मालिका, बातम्या पाहत जेवण करतात. हेच कारण, पोटविकार होण्यासाठी आमंत्रण ठरते आहे. टीव्ही बघता बघता अति खाल्ल्यामुळे अपचनाचा त्रास होतो. त्यामुळे अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. यासाठी वेळीच खबरदारी घ्यावी व शांतचिताने, एकाग्रतेने जेवण केले तरच व्यवस्थित पचन होते व पोटविकाराचा त्रास होत नाही, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
विशेषत: रात्रीचे जेवण सहकुटुंब टीव्हीसमोर बसून करतात. आता अशा जेवणाची पद्धत एवढी अंगवळणी पडली आहे की, अनेकांना टीव्ही चालू असला तरच जेवण जाते. मोबाईल किंवा टीव्हीसमोर असले तरच लहान मुले जेवण करतात, अशी तक्रार घेऊन अनेक पालक डॉक्टरांकडे येत असतात. मनोरंजनासाठी टीव्ही पाहिलाच पाहिजे. मात्र, जेवण करताना टीव्हीसमोर बसून जेवण करणे हे पोटविकाराला आमंत्रण देण्यासारखे होय. यावर संशोधन होणे गरजेचे आहे. मात्र, पोटविकार तज्ज्ञांकडे येणाऱ्या केसेसमध्ये हाच मुद्दा प्रखरतेने जाणवतो.
चौकट
पोटविकाराचे प्रमुख कारणे
१ ) टीव्ही पाहत जेवण केल्यास जेवणावर लक्ष राहत नाही. अति खाल्ल्यामुळे अपचनाचा त्रास होतो.
२) टीव्ही पाहताना काही वेळा घाईघाईने जेवण केले जाते. त्यामुळे ठसकाही लागण्याची शक्यता असते.
३) अन्नाची पचनक्रिया व्यवस्थित न झाल्यास पोटदुखीचे आजार बळावण्याची शक्यता असते.
४) काही मुलांना टीव्ही किंवा मोबाईल समोर असल्याशिवाय जेवण जात नाही. तशी मानसिकता त्यांची तयार होते. त्यांचे सतत लक्ष अन्नापेक्षा टीव्हीकडे असते. त्याचा मानसिक परिणाम होतो.
५) एकाग्रतेने चावून जेवण केले तर तोंडात लाळ तयार होते. त्यामुळे जेवण पचनास मदत होते. टीव्हीकडे सर्व लक्ष असल्याने अन्न चावून खाण्यापेक्षा गिळले जाते. सतत पाणी पिल्याने लाळ तयार होत नाही.
चौकट
पोटविकार टाळण्यासाठी
१) शांतचिताने, एकाग्रतेने जेवण करा.
२) अन्न नीट चावून खा.
३) घाईघाईने अन्न खाऊन ते गिळण्यासाठी लगेच पाणी पिऊ नका.
४) ठरलेल्या वेळेवर जेवण करा.
५) जेवण व झोपणे यात किमान २ तासाचे अंतर पाहिजे.
६) रात्रीचे जेवण केल्या केल्या झोपू नका, शतपावली करा.
७) दिवसापेक्षा रात्रीचे जेवण कमी करा.
८) मन प्रसन्न ठेवून सहपरिवार जेवण करा.
चौकट
मुले जेवत नाही म्हणून टीव्ही, मोबाईलचा वापर
टीव्ही थोडावेळ बंद असला तर मुले लगेच चिडचीड करतात. जेवण करत नाही. ही वाईट सवय आहे, पण नाईलाजाने करावे लागते.
शालिनी जवळकर
गृहिणी
----
आम्ही संपूर्ण कुटुंबीय रात्रीचे जेवण टीव्हीसमोर बसून करतो. अनेकदा टीव्ही पाहण्यात एवढे मग्न होतात की, आपण काय खातो याकडे त्यांचे लक्ष राहत नाही. अपचनाचा, असिडिटीचा त्रास सतत जाणवत असतो.
सुरेखा सोनटक्के
गृहिणी
----
आम्ही टीव्ही बंद करून जेवणाचा प्रयत्न केला होता. मात्र, आम्हाला टीव्हीची एवढी सवय झाली की, तेव्हा जेवणच गेले नाही. काहीतरी चुकल्यासारखे वाटू लागले.
आशा श्रीमाळी
गृहिणी
----
(डॉक्टरच्या प्रतिक्रिया)
असे पाहण्यात आले आहे की, टीव्हीवर भीतीदायक मालिका किंवा बातमी पाहताना जास्त अन्न खाल्ले जाते. रात्रीचे जेवण कमीच असावे, अति खाल्ल्याने पोटविकाराच्या तक्रारी वाढतात. मधुमेहासारखे आजारही बळवतात. यासाठी कुटुंबाने एकत्रित जेवण करावे पण टीव्ही व मोबाईल दूर ठेवूनच.
डॉ. अजय रोटे
मधुमेहतज्ज्ञ
-------
टीव्ही किंवा मोबाईल बघत जेवण केल्याने पोटाचे विकार होतात, यास काही शास्त्रीय कारण समोर आले नाही. त्याविषयी संशोधन होणे आवश्यक आहे. मात्र, जेवताना मन एकाग्र असणे, शांतचित्ताने, सावकाश जेवण करणे, प्रत्येक घास चावून खाल्ल्यास अन्न पचन होते.
डॉ. सुरेश हरबडे
वैद्यकीय अधीक्षक, घाटी रुग्णालय
-----
टीव्हीसमोर बसून जेवणे टाळावे. अनेकदा टीव्ही पाहण्याच्या नादात अति जेवण होते. यातून अपचन, जाडपणा येतो. पोटविकार होतात.
डाॅ. सरोजनी जाधव, विभाग प्रमुख शल्यचिकित्सा शास्त्र, घाटी.