प्रताप नलावडे, बीडग्रामीण भागातून आलेल्या मुलांसाठी राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करणारे जवळपास ८० खासगी वसतीगृहे शहरात असून यापैकी ५० पेक्षाही अधिक वसतीगृहे बेकायदेशीरपणे चालविले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वसतीगृहाच्या नावावर चालणारा हा गोरख धंदा चालविणाऱ्यापैकी अनेकजण शिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. साईड बिझनेस म्हणून चालणाऱ्या या धंद्यातून मुले सांभाळण्याच्या नावाखाली पैसे कमावण्याचा वेगळा फंडा काही शिक्षकांकडूनच चालविला जात आहे.वडापाव खाल्ला म्हणून आदित्य राठोड या मुलाला वसतीगृह चालविणाऱ्या दिलीप जोगदंड या शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आता शहरातील बेकायदेशीर चालणाऱ्या वसतीगृहेही चर्चेत आली आहेत. शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या काही शिक्षकांनी वसतीगृहाचा धंदाच सुरू केला आहे.एका इमारतीत सामाजिक कार्याच्या गोंडस नावाखाली वसतीगृह सुरू करायचे आणि ग्रामीण भागातील मुलांना याठिकाणी प्रत्येकी तीस ते पस्तीस हजार रूपये वार्षिक शुल्क आकारून त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करायची. एका इमारतीत दहा ते पंधरा दहा बाय दहाच्या खोल्या आणि एका खोलीत दहा ते बाराजणांची व्यवस्था, असे काहीसे या सगळ्याच वसतीगृहांचे स्वरूप आहे. वसतीगृह सुरू करताना कोणतीही परवानगी घेतली जात नाही.धर्मादाय आयुक्तांकडे रितसर नोंद असणे किंवा किमान शॉप अॅक्टचे आणि त्याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था असल्याने फुड लायसेन्स तरी असणे आवश्यक आहे. परंतु असे कोणतेच सोपस्कार पूर्ण न करता ही वसतीगृहे बिनदिक्तपणे सुरू आहेत. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नच ऐरणीवर आला आहे.शहरातील धानोरा रोड, शिवाजी नगर, अंबिका नगर, स्वराज्य नगर, पंचशील नगर, नाट्यगृह परिसर, राजीव गांधी चौक या परिसरात अनेक खासगी आणि बेकायदेशीर वसतीगृहे चालविली जात आहेत.ज्या शाळेतील शिक्षक वसतीगृह चालवितात, त्यांच्याच शाळेतील मुले याठिकाणी राहतात. जोगदंड चालवित असलेल्या वसतीगृहात ते आदर्श शाळेत शिक्षक असल्याने त्याच शाळेतील मुले मोठ्या प्रमाणात राहतात.एका मुलासाठी आपण वीस हजार रूपये घेतो, असे सांगत जोगदंड आपल्याकडे ४० मुले असून सामाजिक कार्य म्हणून आपण हे वसतीगृह चालवितो असे सांगतात. परंतु यासाठी कोणकोणत्या परवानगी त्यांच्याकडे आहेत, असे विचारले तर सामाजिक कामाला परवानगी कशाला, असे विचारतात. ते ज्या शाळेत शिकवतात त्या आदर्श शाळेचीही त्यानी परवानगी घेतलेली नाही.
बेकायदेशीर वसतिगृहात सुमार व्यवस्था, निकृष्ट जेवण आणि मुलांचा छळ
By admin | Published: August 26, 2016 12:16 AM