छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर एका कार्यक्रमासाठी येणार होते. त्यासाठी महापालिकेने तीन कोटी रुपये खर्च करून एमआयडीसी चिकलठाणा भागातील रिद्धी-सिद्धी ग्राउंडवर भव्य मंडप उभारणे सुरू केले होते. ऐनवेळी शाह यांचा दौरा रद्द झाला. निविदा प्रक्रियेत दौरा रद्द झाला तर पैसे मिळणार नाहीत, अशी अटच टाकलेली नव्हती. त्यामुळे ‘शुअर शॉट’कंपनीला ३ कोटी रुपये अदा करावेच लागणार असल्याची माहिती मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.
हैदराबाद मुक्तिसंग्रामच्या अमृतमहोत्सवी सांगता समारंभासाठी अमित शाह शहरात येणार होते. दौऱ्याचा कार्यक्रमही प्राप्त झाला होता. दीड तासासाठी ते शहरात येणार असल्यामुळे विमानतळाहून सभास्थळी जाण्याचा त्यांचा वेळ वाचावा म्हणून अयोध्यानगरीच्या मैदानाऐवजी कलाग्राम समोरील रिद्धी सिद्धी लॉन्सवर जाहीर सभेचे आयोजन केले होते. ५० हजार नागरी क्षमतेचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. दरपत्रकावर शुअर शॉट कंपनीला काम देण्यात आले. तीन कोटींचा खर्च यासाठी मंजूर करण्यात आला. परंतु, ऐनवेळी अमित शाह यांचा दौरा रद्द झाला.
पत्रकारांशी बोलताना जी. श्रीकांत यांनी नमूद केले, दौरा रद्द झाला ही शहरासाठी दुर्दैवी बाब आहे. शहराच्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या समोर मांडता आले असते. कंत्राटदाराला काम देतानाच्या अटींमध्ये सभा रद्द झाली तर मंडप उभारण्याचा खर्च मिळणार नाही, असा उल्लेख नव्हता, त्यामुळे मंडप उभारणीचे पैसे कंत्राटदाराला द्यावेच लागणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.