औरंगाबाद : कर भरूनही पाणी मिळत नसल्यामुळे शुक्रवारी बीड बायपासवरील विविध वसाहतींमधील महिलांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना त्यांच्या दालनात घेराव घातला. या नागरिकांनी महापौरांना सर्वसाधारण सभेला जाण्यापासून मज्जाव केला.
बीड बायपास आणि रेल्वेलाईनच्या मधला भाग असलेल्या मुस्तफाबादचा परिसर, संग्रामनगर पुलाच्या डावा भाग, सेनानगर, शिवकृपा कॉलनी, राजगुरूनगर, पीडब्ल्यू कॉलनी, अथर्व सोसायटी, एमआयटी कॉलेजसमोरील संपूर्ण भाग मनपा हद्दीत आहे. गेल्या १५ वर्षांपासून वस्ती आहे. बांधकाम परवाने घेऊन घरे बांधली आहेत. सगळे नागरिक मनपाचा कर भरतात. येत्या पंधरा दिवसांत या भागाला पाणी मिळाले नाही तर आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संतप्त महिला व नागरिकांनी यावेळी दिला.महापालिका पथक शिबीर लावून कर वसुली करते. मात्र नागरिकांना पाणी देत नाही. नळजोडणी करून परिसरातील कॉलनीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी महिलांनी केली. कॉलन्यांमध्ये असलेले बोअरवेल डिसेंबर महिन्यातच तळ गाठतात, त्यामुळे नाईलाजास्तव दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. त्यामुळे गंभीर आजाराचा धोका संभवत आहे.पाहणी करणारपरिसरातील विविध कॉलन्यांना लवकर पाणी कसे देता येईल या दृष्टिकोनातून महापौर नंदकुमार घोडेले हे पाणीपुरवठा तसेच तांत्रिक विभागाच्या शिष्टमंडळासह विवेकानंदनगर व इतर कॉलनीत नागरिकांना भेटून चर्चा करून मार्ग काढणार असल्याचे आंदोलकांना सांगितले. यावेळी नगरसेविका शोभा बुरांडे, प्रशांत अवसरमल, मीना पिसोळे, शोभा सुंब, सुवर्ण निकम, अंजली निकम, गौरी निकम, वनिता घुगल आणि प्राची चव्हाण यांच्यासह बीड बायपास परिसरात राहणाऱ्या नागरिकांची उपस्थिती होती.