औरंगाबाद : वैद्यकीय सेवा देत असताना कामकाजात येणाऱ्या अडचणीतून शिकले पाहिजे. परिश्रम आणि पारदर्शकपणे काम केल्यास यश निश्चित मिळते, असा गुरुमंत्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना दिला.
न्यायालयीन कामानिमीत्त सोमवारी शहरात आल्यानंतर डॉ. शिनगारे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) भेट दिली. यावेळी महाविद्यालयातर्फे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपाधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे , डॉ. राजन बिंदू, डॉ. मोहन डोईबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे (राज्य कर्करोग संस्था) विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. मंगला बोरकर, डॉ. वर्षा रोटे, डॉ. सिराज बेग , डॉ. चंद्रकांत थोरात, डॉ. सुधीर चौधरी, डॉ. एल. एस. देशमुख, डॉ. सरोजनी जाधव, डॉ. वर्षा नांदेडकर, आदींची उपस्थिती होती.
डॉ. शिनगारे ३१ जानेवारीला सेवानिवृत्त होत आहे. याप्रसंगी त्यांनी कॉलेज कॉन्सीलमध्ये घाटीतील डॉक्टरांबरोबर चर्चा केली. गेली काही वर्षे संचालकपदी काम करताना आलेल्या अनुभवांचे त्यांनी कथन केले.