छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटीने तब्बल २५० कोटी रुपये खर्च करून ७५० सीसीटीव्ही शहरातील मुख्य रस्त्यांवर बसविले आहेत. आता याच सीसीटीव्हीच्या माध्यमाने मुख्य रस्त्यांवर, दुभाजकात कचरा आणून टाकणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवले जात आहे. भडकलगेट भागातील ज्युबिली पार्क येथे कचरा टाकण्याचा प्रकार घडला. सीसीटीव्हीच्या माध्यमाने टाकणाऱ्याचा शोध घेऊन तब्बल ४ हजार रुपये दंडाची रक्कमही वसूल करण्यात आली.
७५० हायटेक कॅमेऱ्यांच्या माध्यमाने संपूर्ण शहरावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तालय, स्मार्ट सिटी कार्यालयात दोन कंट्रोल रूम उभारण्यात आल्या आहेत. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मनपाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यानंतरही नागरिक रस्त्यांवर कचरा आणून टाकत आहेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी प्रशासनाने सीसीटीव्हीची मदत घेण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी ज्युबिली पार्क येथील मेडिकलचा कचरा दुभाजकावर टाकला होता.
स्मार्ट सिटीतील कमांड अँड कंट्रोल रूमच्या साह्याने कचरा कोणी टाकला, हे शोधून काढण्यात आले. मनपा घनकचरा विभागातील व्हिडीओ पाठविण्यात आले. पथकाने अवघ्या काही तासांत कचरा टाकणाऱ्या मेडिकल चालकाचा शोध घेतला. त्याला ४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. उपायुक्त सोमनाथ जाधव यांच्या निर्देशानुसार ही कारवाई स्वच्छता निरीक्षक उमाकांत गोदे, आशिष शिंदे, नागरिक मित्र पथकाचे परदेशी, गवली यांनी केली. सुयोग शिरसाठ, विशाल खरात यांनी कंट्रोल रूममध्ये मदत केली.