औरंगाबाद : औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) एमबीबीएस झाले, येथेच ‘एमडी’ झाले. त्यानंतर अनेक जिल्ह्यांत जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम केले; पण ज्या शहरात वैद्यकीय शिक्षण झाले, तेथे सेवानिवृत्तीपूर्वी काम करता आले. त्यामुळे आपल्या सेवेचे सार्थक झाले, एक प्रकारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ऋण फेडता आले, अशी भावना जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी हे प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त ‘लोकमत’शी त्यांनी संवाद साधला. वैद्यकीय क्षेत्रात भूलतज्ज्ञ हे पडद्यामागील कलावंत म्हणून ओळखले जातात. डाॅ. कुलकर्णी हेदेखील एमडी अनेस्थेटिस्ट आहेत. त्यांची १९८५ मध्ये ‘एमपीएससी’द्वारे वैद्यकीय अधिकारीपदी निवड झाली. त्यानंतर क्लास वन अनेस्थेटिस्ट ते जिल्हा शल्यचिकित्सक असा त्यांनी प्रवास केला. नंदुरबार, धुळे, सिंधुदुर्ग, नाशिक याठिकाणी त्यांनी काम केले. ऑगस्ट २०१८ मध्ये ते औरंगाबाद जिल्हा शल्यचिकित्सकपदी रुजू झाले. तेव्हा नव्यानेच बांधून झालेल्या चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ ओपीडी सुरू होती. त्यांनी एक-एक विभाग आणि आंतररुग्ण विभाग सुरू केला. याठिकाणी प्रसूती सेवाही सुरू झाली. त्यामुळे घाटीवरील भार कमी होण्यास मदत झाली. त्यानंतर कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालयात बदलले. महामारीच्या संकटात कोरोना नियंत्रणासाठी काम करता आले, ही बाब आपल्यासाठी अधिक महत्त्वाची ठरल्याचे डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले.
---
फोटो ओळ....
जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी.